उल्हासनगर : पावसानंतरचे धुके, रात्रीचा अंधार आणि नागरिक गाढ झोपेत असण्याचा फायदा घेत अंबरनाथच्या अतिरिक्त एमआयडीसीतील काही रासायनिक कंपन्यांकडून प्रक्रिया न करताच कथितरीत्या रासायनिक वायू हवेत सोडला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. उग्र वास आणि धुक्यासदृश चादरीमुळे उल्हासनगरच्या सीमावर्ती परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अंबरनाथ पश्चिमेकडील एमपी गेटजवळील अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील काही रासायनिक कंपन्यांकडून रात्रीच्या अंधाराचा आणि पावसामुळे निर्माण झालेल्या धुक्याचा फायदा घेत कथितरीत्या रासायनिक वायू हवेत सोडला जात असल्याचा आरोप ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी केला आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
उल्हासनगर पूर्वेकडील पॅनल क्रमांक १८ मधील भारतनगर, सुभाष टेकडी आणि दहा चाळ परिसरात धुक्यासदृश चादर पसरते. त्याचबरोबर परिसरात उग्र वासही जाणवत असल्याचे चंदनशिव यांनी सांगितले.
नागरिकांची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयाने तक्रारीची दखल घेत ती पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाकडे पाठविल्याचे चंदनशिव यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन करून वायू उत्सर्जन केले जाते का? याची तपासणी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.