उल्हासनगर : उल्हासनगरच्या मानेरे गावातील संतोष साळवेचा मृतदेह रविवारी वडोल गावाजवळील आम्रपाली नगरच्या शेजारी रेल्वे रुळावर आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडवली. संतोषचा मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला, त्यानंतर संतोषच्या कुटुंबीयांनी या मृत्यूसाठी बाळू किडे आणि अजय माळी यांना जबाबदार धरत जुन्या भांडणाच्या रागातून हत्या केल्याचा आरोप केला आहे. मात्र आता प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनंतर पोलिसांसमोर या घटनेचा तपास करताना नवा पेच उभा राहिला आहे.
प्रत्यक्षदर्शी विकास निर्मळ आणि धम्मपाल मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष साळवे हा दारूच्या नशेत रेल्वे रुळावरून चालत असताना सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलने त्याला उडवले. हा प्रकार त्यांच्या डोळ्यादेखत घडल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संतोषचा मृत्यू हा अपघात होता की आत्महत्या याबाबत देखील शंका निर्माण झाली आहे.
संतोषच्या कुटुंबीयांचा हत्या असल्याचा दावा आणि प्रत्यक्षदर्शींचा अपघाताचा दावा यामुळे पोलीस विभाग अडचणीत सापडला आहे. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे बाळू किडे आणि अजय माळी यांची चौकशी सुरू असून प्रत्यक्षदर्शींच्या माहितीसोबत साक्षी पुरावे गोळा करण्यात येत आहेत. रेल्वे पोलिसांच्या अहवालावरही विशेष भर दिला जात आहे. संतोष साळवेच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस सर्व शक्यतेचा तपास करत आहेत. हा अपघात, आत्महत्या की हत्या, हे लवकरच उघड होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र या घटनेने उल्हासनगरमधील जनतेत उलटसुलट चर्चा सुरू झाली असून सत्य समोर येईपर्यंत हा प्रश्न गूढच राहणार आहे.