वाहतूककोंडीवर ‘स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट’चा पायलट प्रोजेक्ट; गुगल मॅप्सवर कोंडी दिसताच उल्हासनगर वाहतूक पोलिसांची घटनास्थळी धाव 
ठाणे

वाहतूककोंडीवर ‘स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट’चा पायलट प्रोजेक्ट; गुगल मॅप्सवर कोंडी दिसताच उल्हासनगर वाहतूक पोलिसांची घटनास्थळी धाव

रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, हॉर्नचा कर्कश आवाज सुरू झाला आणि नागरिक त्रस्त झाल्यानंतर वाहतूक पोलिसांकडे तक्रार पोहोचण्याची वाट आता पाहावी लागणार नाही.

प्रतिनिधी

नवनीत ब‌ऱ्हाटे /उल्हासनगर

रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, हॉर्नचा कर्कश आवाज सुरू झाला आणि नागरिक त्रस्त झाल्यानंतर वाहतूक पोलिसांकडे तक्रार पोहोचण्याची वाट आता पाहावी लागणार नाही. शहरातील कोणत्या रस्त्यावर वाहतूककोंडी वाढत आहे, याची माहिती गुगल मॅप्सवर ‘लाल रंग’ दिसताच वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळणार असून, क्षणाचाही विलंब न करता संबंधित ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पथक रवाना होणार आहे.

अरुंद रस्ते आणि झपाट्याने वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या उल्हासनगरकरांना दिलासा देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तंत्रज्ञानाची मदत घेत ‘स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट’चा अभिनव पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

वाहतूक कार्यालयात नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर स्वतंत्र स्क्रीन बसविण्यात आली असून, त्यावर गुगल मॅप्सच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीच्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

एखाद्या मार्गावर वाहनांची गर्दी वाढून गुगल मॅप्सवर संबंधित भाग लाल रंगात दिसताच त्या ठिकाणी तातडीने वाहतूक पोलिसांचे पथक पाठविण्यात येणार आहे. यासाठी दोन प्रशिक्षित अंमलदारांची विशेष नियुक्ती करण्यात आली असून, ते नियंत्रण कक्षातून शहरातील वाहतुकीवर नियमित नजर ठेवणार आहेत.

उल्हासनगरमधील अनेक रस्ते अरुंद असल्याने किरकोळ अडथळा, बेशिस्त पार्किंग किंवा वाहनांची अचानक वाढलेली संख्या काही मिनिटांत मोठ्या कोंडीचे रूप धारण करते. त्याचा परिणाम रुग्णवाहिका, शालेय बस, सार्वजनिक वाहतूक आणि अत्यावश्यक सेवांवरही होतो. त्यामुळे नागरिकांची तक्रार आल्यानंतर कारवाई करण्याऐवजी कोंडीची चाहूल लागताच पोलिसांना घटनास्थळी पोहोचविणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
युवराज सरनोबत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

पोलिसांची धाव हाच मुख्य उद्देश

अनेक रस्ते अरुंद असल्याने किरकोळ अडथळा, बेशिस्त पार्किंग किंवा अचानक वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतूककोंडी होते. कोंडीची चाहूल लागताच पोलिसांना घटनास्थळी पोहोचविणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...