उल्हासनगर : उल्हासनगर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या सावटाखाली आहे. कॅम्प १ भागात जुन्या भांडणाचा राग मनात धरून तब्बल १० ते १५ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्रांनी आणि चाकूने सपासप हल्ला करत त्याची निघृण हत्या केली. या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून मृत तरुणाची गरोदर पत्नी रुग्णालयात तडफडत न्यायाची मागणी करत आहे. या प्रकरणी घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत रोहित पासी आणि प्रवीण उज्जीनवाल यांना अटक केली. मात्र उर्वरित आरोपी अजूनही फरार आहेत.
साजिद शेख असे मृत तरुणाचे नाव असून, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी कॅम्प १ येथील साईबाबा मंदिर परिसरात त्याची आणि रोहित पासी या तरुणाची वाद मिटवण्यासाठी भेट झाली होती. मात्र या बैठकीत वाद आणखीच चिघळला. यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जीनवाल यांनी साजिदच्या मित्राला रस्त्यात अडवून, साजिदला तिथे बोलावण्याचे आव्हान दिले.
मित्राच्या मदतीसाठी धावत गेलेल्या साजिदवर अचानक १० ते १५ जणांनी मिळून धारदार शस्त्रांनी बेधडक हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या साजिदला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
साजिदच्या गरोदर पत्नीने रुग्णालयातच मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सर्व आरोपींना अटक झाली नाही, तोपर्यंत साजिदचे शव मी उचलणार नाही, असे म्हणत तिने टाहो फोडला. एकीकडे नवऱ्याच्या मृत्यूचा आघात, दुसरीकडे पोटात वाढणाऱ्या बाळाच्या भवितव्याची चिंता अशा दुहेरी आघाताने ती खचून गेली असल्याचे स्पष्ट जाणवले. या घटनेने परिसरात खळबळ माजवली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या नेतृत्वाखाली तपास वेगाने सुरू असून, लवकरच उर्वरित आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.