ठाणे

उल्हासनगर : साडी विक्रेत्यांवर नशेखोरांचा चाकूहल्ला

उल्हासनगर शहरात एका साडी विक्रेत्या दुकानात साडी खरेदीच्या कारणावरून नशेखोर तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात एका साडी विक्रेत्या दुकानात साडी खरेदीच्या कारणावरून नशेखोर तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात व्यापारी दीपक बेहरानी आणि गोविंद बेहरानी गंभीर जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, उल्हासनगरात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उल्हासनगरातील कॅम्प नंबर ३ परिसरात हिरा मॅरेज हॉलजवळ दीपक साडी शॉप आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दोन नशेखोर तरुण साडी खरेदीसाठी दुकानात आले. त्यांना काळ्या रंगाची साडी पाहिजे होती, परंतु ती साडी दुकानात उपलब्ध नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. या साध्या नकारानेच या तरुणांचा पारा चढला आणि त्यांनी व्यापाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले आणि संतापलेल्या तरुणांनी आपल्या खिशातून चाकू काढून दीपक बेहरानी आणि गोविंद बेहरानी यांच्यावर हल्ला केला. हल्ला इतका गंभीर होता की दोन्ही व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. तातडीने त्यांना मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

या घटनेनंतर उल्हासनगरातील व्यापारी वर्गामध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यावसायीकांना आता स्वतःचा जीव मुठीत धरून काम करावे लागते, अशी भावना व्यक्त करत व्यापाऱ्यांनी पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील सुरक्षेचे प्रमाण कमी होत आहे, आणि याचा परिणाम व्यापाऱ्यांच्या जीवावर होतो आहे, असे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.

घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच पकडून कठोर शिक्षा करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे.

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

राज्यात २० जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा, सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबरला मतदान

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

RBI मोठा निर्णय घेणार! पतधोरणात व्याजदरामध्ये कपात करणार?

आंध्रात ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा