उल्हासनगर : शहरी भागातील बाजारपेठांमध्ये स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र, उल्हासनगरमध्ये समोर आलेला प्रकार केवळ अस्वच्छतेपुरता मर्यादित नसून तो थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे. कॅम्प २, खेमाणी भागातील भाजी विक्रेत्यांकडून चक्क उघड्या गटाराच्या पाण्यात भाज्या धुतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा किळसवाणा प्रकार नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारा असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
खेमाणी परिसरातील भाजी मार्केटमध्ये पोस्ट ऑफिस समोर एक मोठे गटार असून, काही भाजी विक्रेते याच गटारातील पाण्यात पालेभाज्या बुडवून स्वच्छ करत असल्याचे या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. या प्रकारामुळे उल्हासनगरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ज्या भाज्या बाजारातून विकत घेतल्या जात आहेत, त्या जर अशा गटाराच्या पाण्यात धुतल्या जात असतील, तर त्या खाण्यामुळे आरोग्याचा फायदा सोडाच, पण गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.प्रशासनाने यावर गंभीर लक्ष देत संबंधित भाजी विक्रेत्यांवर कारवाई करून शहरातील खाद्यपदार्थ आणि भाज्यांच्या स्वच्छतेची खातरजमा करण्यासाठी नियमित तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.