बदलापूर महानगरपालिका कधी? आमदार किसन कथोरे यांची विधानसभेत मागणी 
ठाणे

बदलापूर महानगरपालिका कधी? आमदार किसन कथोरे यांची विधानसभेत मागणी

ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात झपाट्याने होत असलेले शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे रूपांतर स्वतंत्र महानगरपालिकेत करण्यात यावे, अशी मागणी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली.

Swapnil S

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात झपाट्याने होत असलेले शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे रूपांतर स्वतंत्र महानगरपालिकेत करण्यात यावे, अशी मागणी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली. औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी सभागृहाचे आणि राज्य शासनाचे लक्ष या महत्त्वाच्या विषयाकडे वेधले. त्यांच्या या मागणीनंतर पुन्हा एकदा बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका होणार की अंबरनाथ-बदलापूरची संयुक्त महानगरपालिका स्थापन होणार, याविषयीच्या चर्चांना वेग आला आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर यांच्या संयुक्त महानगरपालिकेचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र, बदलापूरची अंबरनाथसोबत संयुक्त महानगरपालिका नको, तर स्वतंत्र महानगरपालिका व्हावी, अशी भूमिका आमदार किसन कथोरे यांनी गेल्या दशकभरापासून सातत्याने मांडली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा सभागृहात उपस्थित केला.

कुळगाव-बदलापूर शहराचा विस्तार अत्यंत वेगाने होत असून वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा विकास परिसरातील ग्रामपंचायतींच्या हद्दीकडे झपाट्याने होत आहे. या अनियंत्रित वाढीमुळे भविष्यात अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामांना चालना मिळण्याची भीती व्यक्त करत, वाढत्या शहरीकरणाला नियोजनबद्ध दिशा देण्यासाठी शहराच्या हद्दवाढीची आवश्यकता असल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले.

हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित

गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सध्या शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाखांच्या घरात पोहोचली असून, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आवश्यक नागरी सुविधा पुरविण्यासाठी विद्यमान नगरपरिषदेची यंत्रणा अपुरी पडत असल्याचे त्यांनी नमूद केले. हद्दवाढीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन वाढीव क्षेत्राचा समावेश करावा आणि त्यानंतर कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे स्वतंत्र महानगरपालिकेत रूपांतर करावे, अशी आग्रही मागणी आमदार किसन कथोरे यांनी सभागृहामार्फत शासनाकडे केली.

संयुक्त महानगरपालिकेची चर्चा २०१५ पासून सुरू

सन २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे अंबरनाथ-बदलापूर संयुक्त महानगरपालिकेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही शहरांच्या एकत्रित महानगरपालिका स्थापनेच्या चर्चांना उधाण आले होते. आमदार किसन कथोरे यांनी अंबरनाथ-बदलापूर संयुक्त महानगरपालिकेला ठाम विरोध करत बदलापूरसाठी स्वतंत्र महानगरपालिकेची भूमिका मांडली होती. आता पुन्हा एकदा विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्याने शासन याबाबत ठोस निर्णय घेणार की हा विषय पुन्हा चर्चेपुरताच मर्यादित राहणार, याकडे बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांवर भाजपचे नगराध्यक्ष आहेत, तर अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे या प्रस्तावाला राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : सिया गोयलच्या पॉलिग्राफ चाचणीस संमती; केतन अगरवाल हत्याप्रकरणी तपासाला वेग

Navi Mumbai : ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; महिलेच्या मृत्यूप्रकरणी आयुक्तांची कारवाई

Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठा ८ टक्के पार, कपातीबाबत पालिकेची ‘थांबा व वाट पाहा’ भूमिका

Nagpur : निर्वासित नव्हे, संघर्षरत योद्धा! मोहन भागवत यांचे प्रतिपादन

Mumbai : बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त ११ जणांना अटक