कर्जत : भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास भिवपुरी स्थानकाजवळ घडली.
मयत तरुणाचे नाव विनोद दरचंद कांबळे (वय २०, रा. वडगाव, पुणे) असून तो मित्र गणेश देवकर (२६) याच्यासह मुंबईकडे जात होता. दोघेही कोणार्क एक्स्प्रेसच्या दारात बसले होते. त्याचवेळी दुसऱ्या प्रवाशाला थुंकण्यासाठी जागा हवी असल्याने त्याने विनोदला उठण्यास सांगितले. या क्षुल्लक कारणावरून वाद पेटला आणि झटापट सुरू झाली. या झटापटीत विनोद गाडीबाहेर फेकला गेला.
गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयत तरुणाचा मित्र सुखरूप असून पोलिसांना संपूर्ण माहिती दिली आहे. या प्रकरणी अकोला येथील मंगेश रामदास दरोसे (३६) यास रेल्वे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गाडी कर्जत स्थानकावरून रात्री २.१० वाजता निघाली. त्यानंतर भिवपुरी स्थानकाच्या अलीकडे ही घटना घडली. दरोसे मिरज स्थानकावरून अकोला जाण्याऐवजी चुकीने मुंबईकडे जाणाऱ्या गाडीत बसला होता. त्याचे वागणे थोडे विचित्र असल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली असून कर्जत रेल्वे पोलिस पुढील तपास करीत आहेत.