

सेऊल : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध गेल्या काही महिन्यांपासून कमालीचे ताणले गेलेले असतानाच आता ते पुन्हा सुरळीत होण्याच्या मार्गावर आहेत. आपण भारतासोबत लवकरच व्यापार करार करणार आहोत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यामुळे या दोन्ही देशांत लवकरच मोठा व्यापार करार होऊ शकतो.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर व्यक्त करत, दोन्ही देशांचे संबंध अत्यंत मजबूत असल्याचे सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प सध्या आशियाई देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात दक्षिण कोरियाला भेट दिली. यावेळी ते म्हणाले, अमेरिका व भारत लवकरच दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या व्यापार करारावर स्वाक्षरी करतील. गेल्या काही महिन्यांपासून या करारावर चर्चा चालू आहे. युक्रेन व रशियामधील युद्ध, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचा मुद्दा, त्याला अमेरिकेचा विरोध आणि त्यातून अमेरिकेने भारतावर लागू केलेले ५० टक्के आयात शुल्क या सर्व गोष्टींमुळे हा करार होण्यास उशीर झाला आहे. मात्र, आता हा करार पूर्ण होत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
मोदी देखणे, कणखर!
तुम्ही भारत व पाकिस्तानकडे बघाल तर मी भारताबरोबर व्यापार करार करत आहे. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम व सन्मान आहे. आमच्यात खूप चांगले संबंध आहेत. मोदी हे दिसायला सर्वात देखणे आहेत, तितकेच ते कणखरही आहेत. तरीसुद्धा त्यांनी पाकिस्तानबरोबरचा संघर्ष दोन दिवसांत थांबवला, ही गोष्ट खरंच खूप कौतुकास्पद आहे, असे ट्रम्प म्हणाले.
गेल्या आठवड्यात, तीनपैकी दोन प्रमुख मुद्द्यांवर दोन देशांमध्ये सहमती झाल्याचे वृत्त होते. दरम्यान, भारताने आपल्या कृषी बाजारात अमेरिकेच्या प्रवेशाला परवानगी दिली नव्हती, यामुळे दोन्ही देशांतील चर्चा थांबली होती. रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याच्या भारताच्या तयारीनंतर अमेरिकेने टॅरिफ कपातीची तयारी दर्शवल्याची चर्चा होती.
ट्रम्प यांनी शनिवारी दावा केला होता की, भारत रशियन तेलाची खरेदी बंद करत आहे. भारत रशियन तेल खरेदी 'पूर्णपणे' बंद करत असून चीनही 'मोठ्या प्रमाणावर' कपात करेल. ते मलेशियाला जाताना विशेष विमान ‘एअर फोर्स वन’मध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.
मोदींवर स्तुतीसुमने
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप चांगले व्यक्तिमत्व आहे. कठीण प्रसंगांमध्ये ते अतिशय खंबीर असतात. अर्थात, आमच्यात वादही आहेत. भारत-पाकिस्तान संघर्षावेळीही असेच झाले होते. अगदी दोनच दिवसांत त्यांनी मला फोन केला आणि सांगितले की आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यांनी संघर्ष थांबवला. असे ट्रम्प म्हणाले.