
नवी दिल्ली : भारताचा वाहन उद्योग येत्या पाच वर्षांत जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर जाईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी व्यक्त केला. तसेच दोन वर्षांत भारतातील लॉजिस्टिक खर्च ९ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे त्यांच्या मंत्रालयाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी ॲमेझॉन संभव समिटमध्ये बोलताना, भारताच्या वाहन उद्योगाच्या उल्लेखनीय वाढीची नोंद केली. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून वाहन उद्योग ७ लाख कोटी रुपयांवरून २२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे ते म्हणाले. तसेच भारतात प्रतिष्ठित जागतिक ऑटोमोबाईल ब्रँडची उपस्थिती देशाच्या क्षमतेचे स्पष्ट संकेत आहे, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेतील वाहन उद्योग रु. ७८ लाख कोटींचा पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकाचा ऑटोमोबाईल उद्योग चीनमध्ये - रु. ४७ लाख कोटी आणि आता भारताचा वाहन उद्योग रु. २२ लाख कोटींची उलाढाल असलेला आहे. मला खात्री आहे की, ५ वर्षांत आपण भारतीय वाहन उद्योग जगामध्ये प्रथम क्रमांकावर बनवू इच्छितो. आहे, असे ते म्हणाले.
पुढील दोन वर्षांच्या आत भारतातील लॉजिस्टिक खर्च एका अंकापर्यंत कमी करण्याचे त्यांच्या मंत्रालयाचे लक्ष्य त्यांनी पुढे स्पष्ट केले. भारतात लॉजिस्टिक खर्च १६ टक्के आहे आणि चीनमध्ये तो ८ टक्के आहे, यूएसए आणि युरोपियन देशांमध्ये तो १२ टक्के आहे. सरकारने लॉजिस्टिक खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.