बंगल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याने भडकली आलिया भट्ट; म्हणाली,''हे गोपनीयतेचे स्पष्टपणे उल्लंघन''

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या वांद्रे येथील नव्या घराचे सध्या बांधकाम सुरू आहे. सहा मजली असलेल्या या बंगल्याच्या बांधकामाच्या पाहणीसाठी अनेक सेलिब्रेटीही येथे भेट देतात. दरम्यान, या बंगल्याचा एक व्हिडिओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याबद्दल आलियाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बंगल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याने भडकली आलिया भट्ट; म्हणाली,''हे गोपनीयतेचे स्पष्टपणे उल्लंघन''
Published on

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या वांद्रे येथील नव्या घराचे सध्या बांधकाम सुरू आहे. सहा मजली असलेल्या या बंगल्याच्या बांधकामाच्या पाहणीसाठी अनेक सेलिब्रेटीही येथे भेट देतात. दरम्यान, या बंगल्याचा एक व्हिडिओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याबद्दल आलियाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी (दि.२६) इंस्टाग्रामवर पोस्ट करताना तिने घराचे परवानगीशिवाय चित्रीकरण व प्रसारण करणाऱ्यांवर टीका केली.

परवानगी शिवाय व्हिडिओ काढण्याचा अधिकार नाही - आलिया

आलियाने लिहिले, “मुंबईसारख्या शहरात जागा मर्यादित असते हे मला माहीत आहे. कधी कधी तुमच्या खिडकीतून दिसणारे दृश्य हे एखाद्याचे घर असू शकते. पण, त्यामुळे कोणालाही इतरांच्या खासगी घराचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याचा अधिकार मिळत नाही. आमच्या घराचे बांधकाम अजूनही चालू आहे. तरीही काही माध्यमांनी आमच्या संमतीशिवाय घराचा व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसारित केला आहे. हे गोपनीयतेचे स्पष्टपणे उल्लंघन असून गंभीर सुरक्षेचा मुद्दा आहे. परवानगीशिवाय एखाद्याच्या खासगी जागेचे फोटो किंवा व्हिडिओ घेणे ‘कंटेंट’ नाही, ते सरळ उल्लंघन आहे. ही सामान्य गोष्ट नाही.''

याआधीही घडला होता प्रकार

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आलिया-रणबीरच्या घराची सजावट, बाल्कनी दिसत आहे. मात्र, त्यांच्या बाबतीत हा पहिलाच प्रकार नाही. याआधी २०२३ मध्ये एका छायाचित्रकाराने आलिया व रणबीर घरात आराम करत असताना त्यांचे फोटो काढले होते आणि सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावेळी या दोघांनी संबंधित प्रकाशनाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती.

त्यांची मुलगी राहा कपूरच्या बाबतीत फोटो घेण्यास त्यांनी सुरुवातीला माध्यमांना अडवले नव्हते. परंतु, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी माध्यमांना राहाचे फोटो काढण्यास आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मनाई केली.

logo
marathi.freepressjournal.in