मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठी बिग बॉस सीझन ३ चा उपविजेता आणि अभिनेता जय दुधाणेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल ५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही मोठी कारवाई करण्यात आली.
कोट्यवधी रुपयांचा गंडा
मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून चर्चेत आलेला जय दुधाणे आपल्या रांगड्या व्यक्तिमत्त्वामुळे लोकप्रिय झाला होता. मात्र आता त्याच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात, जय दुधाणेने एकाच दुकानाची बनावट कागदपत्रे तयार करून घेतली होती. ही कागदपत्रे त्याने अनेक ग्राहकांना विक्री करत कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.
कुटुंबियांची चौकशी
या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये (FIR) मध्ये जय दुधाणेसह त्याच्या कुटुंबियांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जयचे आजी-आजोबा, आई आणि बहिण यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
लग्नानंतर अवघ्या ११ दिवसांतच...
काही दिवसांपूर्वीच जय दुधाणे विवाहबंधनात अडकल्याने चर्चेत आला होता. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्याशी त्याने २४ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अवघ्या ११ दिवसांतच त्याच्यावर अटकेची कारवाई झाल्याने चाहत्यांमध्ये आणि मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, पोलिसांकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.