
मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरात पाऊस पडत आहे. आजही पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे.
अशा तुफान पावसातही अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री गिरिजा प्रभू यांनी घरात बसण्याऐवजी चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचले. मंदारने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात दोघेही गुडघाभर पाण्यातून वाट काढत सेटकडे जाताना दिसतात. दोघेही पूर्ण भिजलेले आहेत, सोबतच दोघे पावसाचा आनंद घेताना सुद्धा दिसतात. व्हिडिओच्या शेवटी ते शूटिंगसाठी सेटवर पोहोचतात, जिथे तयारी सुरू असते. या व्हिडीओसोबत मंदारने "मनोरंजनाला ब्रेक नाही" आणि '#ShowMustGoOn' असे कॅप्शन दिले आहे.
'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेतील यश आणि कावेरीची भूमिका साकारत असलेली ही जोडी चाहत्यांना खूप पसंत पडते. त्यांच्या या मेहनतीला चाहत्यांनी कौतुक केलं आहे, तर काहींनी कलाकारांच्या सुरक्षिततेबाबत काळजीही व्यक्त केली आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि लोकल सेवा प्रभावित झाल्या असून, कलाकारांनीही तुफान पावसात साचलेल्या पाण्यातून वाट काढत आपल्या कामाचं ठिकाण गाठलं.