'भूकंप होतोय, लँडिंग थांबवा'; विमान धावपट्टीवर उतरणार इतक्यात हादरली जमीन, लॉस एंजेलिस विमानतळावरील थरारक VIDEO व्हायरल

Los Angeles Earthquake : भूकंपानंतर लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाने (LAFD) आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली. शहरातील संभाव्य नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्व १०६ स्थानिक अग्निशमन केंद्रांमधील कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले.
'भूकंप होतोय, लँडिंग थांबवा'; विमान धावपट्टीवर उतरणार इतक्यात हादरली जमीन, लॉस एंजेलिस विमानतळावरील थरारक VIDEO व्हायरल
'भूकंप होतोय, लँडिंग थांबवा'; विमान धावपट्टीवर उतरणार इतक्यात हादरली जमीन, लॉस एंजेलिस विमानतळावरील थरारक VIDEO व्हायरल(X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
Published on: 

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शनिवारी (दि. २८) सकाळी ५.० तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. याचवेळी लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर (LAX) एक विमान धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत होते. मात्र, विमान लँडिंग करणार इतक्यात भूकंपाचे हादरे जाणवू लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने वैमानिकांना लँडिंग थांबवून विमान पुन्हा हवेत घेण्याच्या सूचना दिल्या. डेल्टा एअर लाइन्सच्या फ्लाइटबाबत घडलेल्या या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विमान धावपट्टीवर उतरणार इतक्यात भूकंपाचे हादरे

लॉस एंजेलिस विमानतळावरील थेट प्रक्षेपणादरम्यान हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला. यामध्ये हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि विमानातील कर्मचाऱ्यांमधील संवाद ऐकू येतो. विमान धावपट्टीजवळ पोहोचत असतानाच अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागले. त्यावेळी कॅमेरा हलताना दिसतो. तसेच परिसरात वाहनांचे अलार्म वाजत असल्याचा आवाजही ऐकू येतो.

काही क्षणांतच हवाई वाहतूक नियंत्रकाने वैमानिकांना लँडिंग रद्द करून विमान पुन्हा हवेत घेण्यास सांगितले. त्यानंतर विमान धावपट्टीजवळून पुन्हा वर उडताना व्हिडीओमध्ये दिसते.

"डेल्टा १९७२, पुन्हा वर उड्डाण करा. येथे मोठा भूकंप होत आहे," अशा सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाने वैमानिकांना दिल्या. हे विमान डेल्टा एअर लाइन्सचे फ्लाइट क्रमांक १९७२ होते. फ्लाइटअवेअरच्या विमान वाहतूक नोंदींनुसार, या विमानाला सुमारे १ तास १३ मिनिटांचा विलंब झाला.

मॅनहॅटन बीचजवळ भूकंपाचे केंद्र

शनिवारी पॅसिफिक प्रमाणवेळेनुसार सकाळी सुमारे ९.३० वाजता हा भूकंप झाला. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र मॅनहॅटन बीचच्या नैऋत्येला सुमारे ५ किलोमीटर अंतरावर, सांता मोनिका उपसागराच्या समुद्रतळाशी होते. भूकंपाची खोली अंदाजे १२ ते १३ किलोमीटर नोंदवण्यात आली.

लॉस एंजेलिसमधील अनेक भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. विमानतळावरही हादरे बसले. विमानतळावरील एका टर्मिनलच्या छतावरील काही टाइल्स खाली पडल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये छतावरील उपकरणे आणि इतर वस्तू हलताना दिसत आहेत.

शहरातील १०६ अग्निशमन केंद्रांतील कर्मचारी तैनात

भूकंपानंतर लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाने (LAFD) आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली. शहरातील संभाव्य नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्व १०६ स्थानिक अग्निशमन केंद्रांमधील कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले.

अग्निशमन विभागाच्या प्रवक्त्या लिंडसे लँट्झ यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासणीत इमारतींचे मोठे नुकसान झाल्याचे किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नव्हते.

लॉस एंजेलिसच्या महापौर कॅरेन बास यांनीही शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भूकंपामुळे आतापर्यंत मोठ्या नुकसानीची माहिती समोर आलेली नसल्याचे सांगितले. मात्र, संभाव्य परिणाम तपासण्यासाठी अग्निशमन विभाग आणि शहरातील पथके काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

भूकंपानंतर आणखी धक्के जाणवण्याची शक्यता लक्षात घेता महापौर कॅरेन बास यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले. भूकंपाचे धक्के जाणवल्यास खाली बसा, सुरक्षित आडोसा घ्या आणि हादरे थांबेपर्यंत तो घट्ट पकडून ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला.

कॅलिफोर्निया राज्याच्या आपत्कालीन सेवा कार्यालयानेही स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम सुरू केले. भूकंपामुळे झालेल्या संभाव्य नुकसानीचा आढावा घेतला जात असून नागरिकांनी त्यानंतर येणाऱ्या धक्क्यांसाठी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्रीय त्सुनामी इशारा केंद्राने या भूकंपामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले.

तेलशुद्धीकरण प्रकल्पातील आगीच्या ज्वाळांबाबत स्पष्टीकरण

भूकंपाच्या घटनेदरम्यान लॉस एंजेलिस विमानतळाजवळील शेवरॉनच्या एल सेगुंडो तेलशुद्धीकरण प्रकल्पातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

मात्र, एल सेगुंडो शहर प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिले. प्रकल्पात 'सेफ्टी फ्लेअरिंग' ही प्रक्रिया सुरू होती. कामकाजात अडथळा निर्माण झाल्यास अतिरिक्त वायू सुरक्षितपणे जाळण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. या आगीच्या ज्वाळांचा भूकंपामुळे झालेल्या नुकसानीशी संबंध नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

'भूकंप होतोय, लँडिंग थांबवा'; विमान धावपट्टीवर उतरणार इतक्यात हादरली जमीन, लॉस एंजेलिस विमानतळावरील थरारक VIDEO व्हायरल
Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप; भारतासह 'या' देशांनाही धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, मुख्य भूकंपानंतर अवघ्या ४५ मिनिटांत किनारपट्टीजवळ आणखी किमान १९ धक्के जाणवले. यामध्ये ३.७ तीव्रतेच्या एका धक्क्याचाही समावेश होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)