

अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस. यंदा १९ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे. अनेकांच्या घरात या दिवसापासून आंब्याच्या हंगामाची खरी सुरुवात मानली जाते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने काहीतरी खास गोड बनवण्याची परंपरा आहे. नेहमीचा आमरस-पूरीचा बेत बाजूला ठेवून यंदा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर आंब्याची गोड पोळी हा एकदम परफेक्ट पर्याय ठरू शकतो.
खमंग, गोड आणि सुगंधी अशी ही आंब्याची पोळी तूप आणि दुधासोबत खाल तर अगदी पोटभर समाधान मिळतं. पुरणपोळीप्रमाणेच ही पोळी बनवली जाते, पण तिचा आंब्याचा खास स्वाद तिला वेगळीच ओळख देतो. चला तर मग, अक्षय्य तृतीयेच्या खास दिवशी घरीच ही चविष्ट आंब्याची पोळी कशी बनवायची ते पाहूया.
साहित्य :
आंबा
कणीक
मीठ
हळद
पाणी
तूप
रवा
दूध
वेलची पूड
जायफळ पूड
कृती :
एका परातीत कणीक घ्या. त्यात चिमूटभर मीठ आणि थोडी हळद घाला. त्यात गरम तूप टाकून हळूहळू पाणी घालत मऊ कणीक मळून घ्या. कणीक मळून झाल्यावर झाकून थोडावेळ बाजूला ठेवा.
आंब्याचा गर काढून घ्या. कढईत थोडं तूप गरम करून त्यात रवा हलक्या आचेवर परतून घ्या. रवा छान भाजला की त्यात आंब्याचा रस घाला. नीट ढवळून त्यात दूध, वेलची पूड आणि जायफळ पूड घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
तयार झालेलं सारण थंड होऊ द्या. गार झाल्यावर हाताने मळून छोटे गोळे तयार करा. कणकेचेही गोळे करून त्यात हे सारण भरून घ्या. पुरणपोळीप्रमाणे हलक्या हाताने पोळी लाटा.
तवा गरम करून पोळी तुपावर खमंग भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.
गरमागरम आंब्याची गोड पोळी तूप आणि दुधासोबत सर्व्ह करा आणि अक्षय्य तृतीयेचा आनंद दुप्पट करा!