बीट म्हणजे पोषणाचं पॉवरहाऊस! पण बीट म्हटलं की नाक मुरडणारे कितीतरी जण असतात. तरीही हे लक्षात घ्यायला हवं की रक्ताभिसरण सुधारण्यात, हिमोग्लोबिन वाढवण्यात आणि थकवा दूर करण्यासाठी बीट अतिशय उपयुक्त आहे. मग नुसता उकडलेला बीट खाण्याचा कंटाळा आला असेल, तर याला थोडं वेगळं, चविष्ट वळण देणं केव्हाही चांगलं!
यासाठी खास तुमच्यासाठी घेऊन आलोय काही झटपट तयार होणाऱ्या आणि तितक्याच आरोग्यदायी बीट रेसिपीज. ज्या रेसिपीज चवदारही आहेत आणि खूप वेळही लागत नाही. मग आरोग्य सांभाळून रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं, रंगतदार आणि चविष्ट हवं असेल, तर या बीट रेसिपीज नक्की करून पाहा!
साहित्य :
१ मध्यम बीटरूट (किसून घेतलेला)
१ वाटी दही
थोडं काळं मीठ
थोडी काळी मिरी पूड
कृती :
बीट उकडून त्याचे साल काढा आणि बारीक किसा. दुसरीकडे, थंड दही एका बोलमध्ये घेऊन ते चांगलं फेटून घ्या. त्यात किसलेलं बीट घालून एकत्र हलवा. वरून थोडं काळं मीठ, मिरी पावडर आणि हवं असल्यास जिरं पावडरही टाका. हे रायतं गारगार ठेऊन जेवणासोबत किंवा नुसतंचही खायला मस्त लागतं.
.........................................................
साहित्य :
१ बीट (किसलेला)
२ चमचे बेसन
१ चमचा रवा
थोडं लाल तिखट, धणे पूड, मीठ
थोडंसं तेल
कृती :
किसलेलं बीट, बेसन आणि रवा एका मोठ्या बोलमध्ये घ्या. त्यात चवीनुसार मीठ, मिरीपावडर, थोडं लाल तिखट आणि हवं असल्यास थोडीशी धणेपूड टाका. सगळं एकजीव करून त्यात थोडंसं पाणी घालून डोश्याच्या पिठासारखं पण थोडं जाडसर मिश्रण तयार करा. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडं तेल पसरवा आणि तयार मिश्रण थोडंसं घालून हलक्या हाताने पसरवा. झाकण ठेवून मध्यम आचेवर शेकावं. दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत शेकून टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करा.
.........................................................
साहित्य :
उकडलेला बीट
मल्टीग्रेन ब्रेड
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर
चाट मसाला, मीठ
कृती :
ब्रेडच्या स्लाइस थोड्याशा बटरसोबत दोन्ही बाजूंनी खरपूस टोस्ट करून घ्या. उकडलेलं बीट साल काढून पातळ चकत्या करा. तव्यावर थोडंसं तेल गरम करून त्यात या चकत्या, थोडं मीठ आणि चाट मसाला टाकून २-३ मिनिटं परतून घ्या. टोस्ट केलेल्या ब्रेडवर कांदा आणि टोमॅटोच्या पातळ चकत्या लावा, त्यावर बीटच्या परतलेल्या चकत्या आणि हवं असल्यास थोडं मस्त चटणीही पसरवा. ही झटपट तयार होणारी बीट टोस्ट सँडविच खूप टेस्टी लागतं.
.........................................................
साहित्य :
१ मध्यम बीट (उकडलेला)
२ लाल सुक्या मिरच्या
२-३ लसूण पाकळ्या
थोडी चिंच
मीठ
कृती :
लहान तुकड्यांत चिरलेलं बीट, दोन लाल सुक्या मिरच्या, दोन लसूण पाकळ्या आणि थोडी चिंच एका चमचाभर तेलात ४-५ मिनिटं मंद आचेवर परतून घ्या. परतलेलं मिश्रण थोडं गार झाल्यावर मिक्सरमध्ये थोडंसं मीठ घालून बारीक वाटून घ्या. ही चमचमीत चटणी इडली, डोसा, पराठा किंवा अगदी भातासोबतही अप्रतिम लागते.
.........................................................
साहित्य :
अर्धा बीटरूट
१ केळं
१ सफरचंद
१/२ वाटी दही किंवा दूध
मध (ऐच्छिक)
कृती :
अर्धं उकडलेलं बीट, एक केळं, अर्धं सफरचंद, अर्धी वाटी थंड दही आणि एक चमचा मध हे सगळं मिक्सरमध्ये एकत्र घालून गार आणि गुळगुळीत स्मूदी तयार करा. हवं असल्यास वरून बर्फाचे तुकडे किंवा थोडं बदामाचं काप घालू शकता. सकाळी नाश्त्याला किंवा वर्कआउटनंतर ही स्मूदी शरीराला भरपूर ऊर्जा देते.