दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर वालपापडीपासून बनणारी खमंग भरली वालपापडी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मसाल्याने भरलेली आणि हलक्या तेलात भाजलेली ही कुरकुरीत भाजी साध्या चपाती, भाकरी किंवा वरण-भातासोबतही अप्रतिम लागते. घरगुती मसाल्याचा सुगंध आणि वालपापडीचा खास स्वाद यामुळे हा पारंपरिक पदार्थ जेवणाच्या ताटात वेगळीच चव आणतो.
कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. पाहुणे आले असतील किंवा रोजच्या जेवणात थोडा बदल करायचा असेल, तर खमंग भरली वालपापडी नक्की करून पाहण्यासारखी आहे.
साहित्य
वालपापडी - पाव किलो
बेसन - २ ते ३ टेबलस्पून
तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून
धणेपूड - ½ टेबलस्पून
जिरेपूड - ½ टेबलस्पून
हळद - ½ टेबलस्पून
लाल तिखट - ½ टेबलस्पून
हिंग - चिमूटभर
कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
लिंबाचा रस - ३ ते ४ टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
वालपापडीतील दाणे - १ ते २ टेबलस्पून (बारीक चिरलेले)
पाणी - गरजेनुसार
तेल - भाजण्यासाठी
कृती
सर्वप्रथम वालपापडीच्या शेंगा स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुवून घ्या. त्यानंतर प्रत्येक शेंग मधोमध हलक्या हाताने उघडून त्यातील धागे काढा आणि काही दाणे वेगळे काढून ठेवा.
आता एका भांड्यात बेसन, तांदुळाचे पीठ, धणेपूड, जिरेपूड, हळद, लाल तिखट, हिंग, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घाला. त्यात चिरलेले वालपापडीचे दाणेही घालून थोडे पाणी टाकत घट्टसर पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट प्रत्येक उघडलेल्या वालपापडीच्या शेंगांमध्ये हलक्या हाताने भरून घ्या.
यानंतर कढईत थोडे तेल गरम करून त्यात मसाला भरलेल्या वालपापडीच्या शेंगा ठेवा. मंद आचेवर त्या दोन्ही बाजूंनी छान खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. तयार आहे खमंग भरली वालपापडी!!!
मसाल्याचा सुगंध आणि कुरकुरीत पोत असलेली ही भरली वालपापडी गरमागरम वरण-भात, चपाती किंवा भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते. घरगुती जेवणात थोडा वेगळा स्वाद आणायचा असेल तर ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा.