हवामानात सतत बदल होत असल्यामुळे सर्दी, खोकला किंवा घशात खवखव होण्याची समस्या अनेकांना जाणवते. अशावेळी लगेच औषधांवर अवलंबून न राहता घरच्या घरी बनवलेला आलेपाक हा एक चांगला पारंपरिक उपाय ठरू शकतो. आल्यामध्ये असलेले गुणधर्म घसा मोकळा करण्यास आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
आलेपाक का फायदेशीर?
सर्दी-खोकला झाल्यावर अनेकदा लोक वेदनाशामक औषधांचा वापर करतात. मात्र वारंवार औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी योग्य नसते. अशावेळी घरगुती आलेपाक खाल्ल्यास घशातील खवखव कमी होण्यास मदत होते. कोरड्या खोकल्यावरही हा उपाय उपयुक्त ठरू शकतो. दिवसातून दोन-तीन वेळा आलेपाकचा छोटा तुकडा चावून खाल्ल्यास आराम मिळू शकतो.
आल्याचे सेवन केल्याने केवळ सर्दी-खोकलाच नाही तर पचनक्रियाही सुधारते. गॅस, ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या असल्यास देखील आलेपाकचा छोटा तुकडा उपयोगी ठरतो.
आलेपाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
आलं
तूप
साखर किंवा गूळ
वेलची पावडर
हळद
चिमूटभर मीठ
पाणी
कृती
सर्वप्रथम आलं स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या आणि छोटे तुकडे करा. त्यानंतर मिक्सरमध्ये आलं आणि साखर घालून बारीक पेस्ट तयार करा. दुसरीकडे कढईमध्ये तूप गरम करून त्यात तयार केलेली आल्याची पेस्ट घाला आणि मंद आचेवर शिजू द्या. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात चवीनुसार मीठ, वेलची पावडर आणि थोडी हळद घालून चांगले मिसळा. यानंतर तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण ओतून एकसारखे पसरवा. थोडेसे थंड झाल्यावर सुरीने चौकोनी किंवा छोटे तुकडे कापा. काही वेळाने हे तुकडे सुकल्यावर काढून घ्या.
अशा प्रकारे घरच्या घरी बनवलेला चविष्ट आणि उपयुक्त आलेपाक तयार होतो. सर्दी-खोकल्याच्या वेळी हा पारंपरिक उपाय नक्कीच उपयोगी ठरू शकतो.