

भेंडीची भाजी अनेकांच्या आवडीची असते. मात्र, भेंडी शिजवताना ती चिकट आणि लगद्यासारखी होण्याची समस्या अनेकांना जाणवते. त्यामुळे भाजीची चव आणि तिचा पोत दोन्ही बिघडू शकतात. विशेषतः भेंडी चिरताना किंवा शिजवताना योग्य काळजी घेतली नाही, तर तिच्यातील नैसर्गिक चिकटपणा अधिक जाणवतो. अशावेळी स्वयंपाक करताना काही सोप्या टिप्स वापरल्यास ही समस्या कमी करता होऊ शकते. जाणून घेऊया पाच सोप्या ट्रिक्स...
१. भेंडी धुतल्यानंतर पूर्णपणे कोरडी करा
भेंडी चिकट होण्यामागे तिच्यावर राहणारा अतिरिक्त ओलावा हे एक कारण आहे. त्यामुळे भेंडी धुतल्यानंतर लगेच चिरण्याची घाई करू नका. सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने भेंडी धुऊन घ्या. त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून किंवा काही वेळ हवेत ठेवून ती पूर्णपणे कोरडी करा. भेंडीवर पाणी राहिलेले नसल्याची खात्री झाल्यानंतरच तिच्या फोडी करा. यामुळे शिजवताना चिकटपणा वाढण्याची शक्यता कमी होते.
२. आंबट पदार्थांचा वापर करा
भेंडीची भाजी शिजवताना तिचा चिकटपणा कमी करण्यासाठी आंबट पदार्थांचा वापर करता येतो. यासाठी लिंबाचा रस, चिंचेचा कोळ किंवा आमचूर पावडर यापैकी एखादा पदार्थ वापरू शकता. हे पदार्थ भाजीचा चिकटपणा कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर भाजीची चवही वाढते. त्यामुळे भेंडीची भाजी करताना यापैकी एखादा पर्याय वापरून पाहू शकता.
३. सुरुवातीला मध्यम ते जास्त आचेवर शिजवा
भेंडीची भाजी सुरुवातीपासूनच मंद आचेवर शिजवल्यास ती नरम आणि चिकट होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीची काही मिनिटे भेंडी मध्यम ते जास्त आचेवर शिजवा. यामुळे भेंडीचा बाहेरील भाग लवकर शिजण्यास आणि तिचा पोत टिकवण्यास मदत होते. भेंडी थोडी घट्ट झाल्यानंतर गॅसची आच कमी करून भाजी नेहमीप्रमाणे शिजवू शकता.
४. सुरुवातीलाच भांड्यावर झाकण ठेवू नका
भेंडीची भाजी शिजवताना सुरुवातीलाच भांड्यावर झाकण ठेवल्यास त्यातील वाफ बाहेर पडत नाही. त्यामुळे भांड्यात ओलावा वाढून भेंडी अधिक चिकट होऊ शकते. म्हणून सुरुवातीला भेंडी उघड्या भांड्यात शिजू द्या. तिचा चिकटपणा कमी होऊन ती थोडी कोरडी दिसू लागल्यानंतर गरजेनुसार झाकण ठेवू शकता.
५. भेंडी वारंवार ढवळू नका
भेंडीची भाजी करताना ती सतत ढवळण्याची सवय टाळा. वारंवार ढवळल्यामुळे भेंडीच्या फोडी तुटू शकतात आणि त्यातून अधिक चिकटपणा जाणवू शकतो. त्यामुळे भाजी काही वेळ न ढवळता शिजू द्या. गरज असेल तेव्हाच हलक्या हाताने ढवळा. यामुळे भेंडीच्या फोडी व्यवस्थित राहण्यास मदत होते.
या पाच सोप्या टिप्स वापरल्यास भेंडीची भाजी करताना येणारा चिकटपणा कमी करता येऊ शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी भेंडीची भाजी बनवताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.