पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहाचा कप हातात घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र दररोज तोच चहा पिण्याऐवजी यावेळी त्याला थोडासा हटके ट्विस्ट दिला तर? सध्या सोशल मीडियावर कॅरॅमल टीची रेसिपी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. साखर कॅरॅमलाइज करून तयार होणारा हा चहा चवीला वेगळा, सुगंधी आणि अधिक क्रीमी लागतो. घरात सहज उपलब्ध साहित्य वापरून हा चहा काही मिनिटांत तयार करता येतो.
कॅरॅमल टीसाठी लागणारे साहित्य
२ चमचे चहा पावडर
२ चमचे साखर
१ कप दूध
१ कप पाणी
थोडेसे केशर
आले
हिरवी वेलची
लवंग
काळीमिरी
चक्रफूल
अशी बनवा कॅरॅमल टी
सर्वप्रथम खलबत्त्यात चहा पावडर आणि साखर हलक्या हाताने भरड वाटून घ्या. हे मिश्रण एका भांड्यात घालून पाणी किंवा दूध न टाकता मंद आचेवर सतत ढवळा. काही वेळात साखर वितळून सोनेरी रंग धारण करेल आणि कॅरॅमल तयार होईल.
यानंतर त्यामध्ये दूध घाला आणि कॅरॅमल पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा. आता केशराचे काही धागे टाका.
दुसऱ्या बाजूला आले, हिरवी वेलची, लवंग, काळीमिरी आणि चक्रफूल खलबत्त्यात कुटून घ्या. हा ताजा मसाला चहात घालून मध्यम आचेवर तीन ते चार उकळ्या येऊ द्या.
चहा चांगला उकळल्यानंतर गाळून गरमागरम सर्व्ह करा. कॅरॅमलचा हलका गोडसर फ्लेवर, मसाल्यांचा सुगंध आणि केशराची चव यामुळे हा चहा नेहमीच्या चहापेक्षा वेगळा आणि अधिक रुचकर लागतो. पावसाळ्यात संध्याकाळच्या वेळेला भजी किंवा बिस्किटांसोबत हा चहा उत्तम पर्याय ठरू शकतो.