

पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि त्यासोबत एखादा खमंग, कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा हमखास होते. अशा वेळी अनेकांच्या पसंतीस उतरतो तो पारंपरिक कोथिंबीर वडीचा बेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेली ही वडी चवीला जितकी अप्रतिम लागते, तितकीच ती बनवण्याची प्रक्रिया अनेकांना कटकटीची वाटते.
वड्या वाफवण्यासाठी मोठा स्टिमर नसणे, पीठ थापण्याची मेहनत आणि योग्य भांडी नसल्यामुळे अनेक जण या वड्या बाहेरून विकत आणतात. मात्र, आता स्टिमरची गरजच नाही. घरातल्या साध्या स्टीलच्या ग्लासचा वापर करून अगदी हॉटेलसारख्या गोल, खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वड्या तयार करता येतात.
स्टिमरशिवाय कोथिंबीर वडीची सोपी ट्रिक
या पद्धतीमध्ये पिठाचे रोल स्टीलच्या ग्लासमध्ये भरून वाफवले जातात. त्यामुळे वड्या एकसारख्या गोल होतात आणि पीठ थापण्याची मेहनतही वाचते. कमी वेळात झटपट तयार होणारी ही रेसिपी पावसाळ्यातील संध्याकाळसाठी एकदम परफेक्ट ठरू शकते.
साहित्य
• बारीक चिरलेली कोथिंबीर - १ जुडी
• हिरव्या मिरच्या - ४ ते ५
• लसूण पाकळ्या - १० ते १२
• जिरे - १ चमचा
• धणे - १ चमचा
• आले - १ छोटा तुकडा
• बेसन - दीड वाटी
• तांदळाचे पीठ - अर्धी वाटी
• लाल तिखट - १ चमचा
• हळद - १ चमचा
• मीठ - चवीनुसार
• हिंग - चिमूटभर
• तीळ - १ वाटी
• पाणी - आवश्यकतेनुसार
• तेल - तळण्यासाठी
कृती
१. मसाल्याचं वाटण तयार करा
सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, धणे आणि आले घालून बारीक वाटण तयार करा.
२. पीठ मळून घ्या
एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, तयार वाटण, लाल तिखट, हळद, मीठ, हिंग आणि तीळ एकत्र करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ तयार करा.
३. ग्लासमध्ये रोल भरून घ्या
दोन किंवा तीन स्टीलचे ग्लास आतून तेल लावून ग्रीस करा. त्यावर थोडे तीळ चिकटवा. पिठाचे लांबट रोल तयार करून ते ग्लासमध्ये उभे ठेवा. पीठ फुगत असल्याने वर थोडी जागा मोकळी ठेवा.
४. वाफेवर शिजवा
मोठ्या कढईत दोन ग्लास पाणी घालून त्यात स्टँड किंवा छोटी प्लेट ठेवा. त्यावर हे ग्लास उभे करून कढईवर घट्ट झाकण ठेवा. मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे वाफेवर शिजवून घ्या.
५. गोल वड्या कापून तळा
ग्लास थंड झाल्यावर चाकूच्या मदतीने वडीचा रोल बाहेर काढा. त्याच्या समान आकाराच्या गोल वड्या कापा. नंतर शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
पावसाळ्यातील चहासोबत परफेक्ट कॉम्बिनेशन
स्टिमर, मोठी भांडी किंवा जास्त कटकट न करता तयार होणारी ही 'ग्लासातली कोथिंबीर वडी' पावसाळ्यातील संध्याकाळ अधिक खास बनवू शकते. घरच्या घरी अगदी बाजारासारखी चव मिळवायची असेल, तर ही सोपी रेसिपी एकदा नक्की करून पाहा.