

सकाळी उठल्यावर नाश्त्यात काय बनवायचं, हा प्रश्न जवळपास प्रत्येक घरात पडतो. विशेषतः मुलांना आवडेल, पोटभर होईल आणि पटकनही तयार होईल असा पदार्थ शोधणं अवघड वाटतं. अशावेळी घरात सहज उपलब्ध असलेल्या रव्यापासून बनणारे कुरकुरीत कटलेट तुमच्या मदतीला धावून येऊ शकतात. बाहेरून खमंग आणि आतून मऊ असलेले हे कटलेट मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट ठरू शकते.
साहित्य
१ कप रवा
२ उकडलेले बटाटे
१ बारीक चिरलेला कांदा
१ बारीक चिरलेली हिरवी मिरची
१/२ कप किसलेले गाजर
२ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
१/२ चमचा लाल तिखट
१/२ चमचा गरम मसाला
चवीनुसार मीठ
ब्रेडक्रम्ब्स
तळण्यासाठी तेल
कृती :
सर्वप्रथम कढईत थोडंसं तेल गरम करून त्यात कांदा, हिरवी मिरची आणि आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यानंतर किसलेलं गाजर घालून काही मिनिटे शिजवा. आता त्यात रवा घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात उकडलेले बटाटे, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून एकजीव करा. तयार मिश्रणाचे छोटे-छोटे कटलेट बनवा आणि ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा.
यानंतर कढईत तेल गरम करून कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. कमी तेलात खायचे असल्यास हे कटलेट शॅलो फ्रायही करू शकता. गरमागरम कटलेट हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
कटलेट आणखी चविष्ट बनवण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा
कटलेट अधिक कुरकुरीत हवे असतील तर मिश्रणात थोडे तांदळाचे पीठ मिसळा. तसेच चीज, स्वीट कॉर्न किंवा आवडत्या भाज्यांचा वापर केल्यास चव आणखी वाढेल. गरमागरम सर्व्ह केलेले हे रव्याचे कटलेट घरातील प्रत्येकाच्या पसंतीस उतरणार आहेत.