
चॉकलेटचं नाव घेतलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. पण नुसतं चॉकलेट खाण्यापेक्षा, त्याची एक हटके रेसिपी ट्राय केली तर त्याची मजा काही औरच असते. तसेच भाज्यांना नाक मुरडणाऱ्या मुलांसाठी एक हेल्दी पर्याय चॉकलेट सॅंडविच. जो नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरतो. मोजक्या साहित्यात आणि झटपट तयार होणारा हा पदार्थ तुमच्या घरात सगळ्यांनाच आवडेल. चला तर मग जाणून घेऊयात याची रेसिपी...
साहित्य :
ब्रेड स्लाइस - ४
बटर - २ चमचे
चॉकलेट स्प्रेड - ३-४ चमचे
किसलेलं डार्क/मिल्क चॉकलेट - २ चमचे
कापलेले ड्रायफ्रूट्स (बदाम, काजू, अक्रोड) - २ चमचे
ऐच्छिक: केळ्याचे पातळ स्लाइस - ४-५
कृती :
ब्रेड स्लाइसच्या एका बाजूला बटर लावा आणि त्यावर चॉकलेट स्प्रेड चांगल्या थराने पसरवा. नंतर किसलेलं चॉकलेट आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स शिंपडा. हवे असल्यास केळ्याचे पातळ स्लाइस देखील ठेवता येतील, ज्यामुळे चव आणखी मस्त लागते. दुसरी ब्रेड स्लाइस त्यावर ठेवा आणि हलकेच दाबा. आता सॅंडविच टोस्टर किंवा तव्यावर दोन्ही बाजू सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजा. गरमागरम सॅंडविच कापून सर्व्ह करा.