Diwali Special : दिवाळीत घरीच बनवा 'नारळ बर्फी'; आताच नोट करून घ्या रेसिपी
दिवाळी म्हणजे घरभर आनंद, प्रकाश आणि गोड चवींचा उत्सव! या दिवाळीत बाजारातून मिठाई विकत घेण्याऐवजी, तुम्ही स्वतःच्या हाताने काहीतरी खास बनवून तुमच्या घरच्यांना एक गोड सरप्राईज देऊ शकता. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय अशीच एक सोपी आणि चविष्ट रेसिपी ‘नारळ मिल्क बर्फी’. ही बर्फी बनवण्यासाठी तुम्हाला गॅस पेटवण्याचीही गरज नाही. फक्त १०-१५ मिनिटांत ही मिठाई तयार होते. चला, तर मग जाणून घेऊया ही सोपी रेसिपी...
साहित्य:
मिल्क पावडर : 1 कप
नारळाचा कीस (पावडर) : 1 कप
कंडेन्स्ड मिल्क : 1/2 कप
दूध : 2–3 चमचे (गरजेनुसार)
तूप : 1–2 चमचे
ड्राय फ्रूट्स : बारीक कापलेले
फूड कलर (ऐच्छिक)
कृती :
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मिल्क पावडर, नारळाचा कीस, कंडेन्स्ड मिल्क आणि तूप एकत्र करा. त्यात थोडे थोडे दूध घालत मऊसर पीठ तयार करा आणि मिश्रण झाकून सुमारे पाच मिनिटांसाठी सेट होऊ द्या. मिश्रणाचे दोन भाग करा, एक मोठा आणि एक लहान. लहान भागात फूड कलर घालून रंगीबेरंगी रोल तयार करा आणि त्यात बारीक कापलेले ड्राय फ्रूट्स भरून नीट रोल बंद करा. मोठ्या भागाला पोळीसारखं लाटून त्यावर रंगीबेरंगी रोल ठेवा आणि गुंडाळून पुन्हा मोठा रोल तयार करा. तयार रोल धारदार सुरीने आवडीनुसार छोटे-छोटे तुकडे करा. वरून थोडे ड्राय फ्रूट्स किंवा चांदीचा वर्क लावून सजवा आणि बर्फी सर्व्ह करा.