

पोहे म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कांदा, मिरची, बटाटा आणि शेंगदाण्यांचा तडका! पण याच पोह्यांचा एक अगदी वेगळा आणि गोडसर प्रकार कोकणातील अनेक घरांमध्ये केला जातो. नारळाच्या पाण्यात भिजवलेले पोहे हा प्रकार चवीला मऊ, हलका आणि नारळाच्या नैसर्गिक गोडव्यामुळे खास लागतो. विशेष म्हणजे यासाठी गॅसवर बराच वेळ उभं राहण्याचीही गरज नाही. काही मोजक्या पदार्थांत हा प्रकार झटपट तयार होतो. गणपतीच्या दिवसांत प्रसादासाठी काहीतरी वेगळं करायचं असेल, तर ही रेसिपी नक्की करून पाहता येईल.
साहित्य
२ वाट्या जाड पोहे
१ ते १.५ वाटी ताजे नारळाचे पाणी
१ वाटी ताजे ओले खोबरे
चवीनुसार साखर
२ ते ३ चमचे दूध
चिमूटभर वेलची पूड (ऐच्छिक)
हवे असल्यास: केळ्याचे तुकडे, काजू-बदाम किंवा मनुका
कृती
सर्वप्रथम पोहे निवडून घ्या. जाड पोहे वापरल्यास हा पदार्थ अधिक मऊ आणि छान लागतो. पोहे पाण्याने हलकेच धुऊन घ्या आणि त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे निथळू द्या.
आता पोह्यांमध्ये हळूहळू नारळाचे पाणी घाला. पोहे पूर्णपणे पाण्यात बुडतील इतके नारळाचे पाणी घालण्याची गरज नाही. पोहे मऊ होण्यासाठी जितके आवश्यक आहे तितकेच पाणी वापरा. काही मिनिटे पोहे तसेच ठेवून द्या.
पोहे मऊ झाले की त्यात ताजे ओले खोबरे आणि साखर घाला. नारळाचे पाणी स्वतःच गोड असल्याने साखर चवीनुसारच घालावी.
यानंतर त्यात थोडेसे दूध मिसळा आणि सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करा. दूध जास्त प्रमाणात घालू नका. पोह्यांना किंचित मऊसरपणा आणि छान पोत मिळेल एवढेच दूध पुरेसे आहे.
अधिक सुगंधासाठी थोडी वेलची पूड घालू शकता. आवडत असल्यास यामध्ये केळ्याचे छोटे तुकडे, काजू-बदाम किंवा मनुका घातल्याने चव आणखी खुलते.
पोहे करताना या गोष्टी लक्षात ठेवा
नारळाचे पाणी घातल्यानंतर पोहे खूप वेळ भिजत ठेवू नका. ते जास्त भिजल्यास पोहे चिकट होण्याची शक्यता असते. पोहे मऊ झाले की लगेच पुढील साहित्य मिसळा.
तसेच दूध सुरुवातीला न घालता शेवटी मिसळल्यास पोह्यांचा पोत व्यवस्थित राहतो. शक्य असल्यास ताजे नारळाचे पाणी आणि नुकतेच किसलेले ओले खोबरे वापरा. त्यामुळे पदार्थाला अधिक छान चव मिळते.
गोड खाण्याची इच्छा झाली तर झटपट पर्याय
नेहमीच्या तिखट पोह्यांपेक्षा हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे. नारळाचे पाणी, ओले खोबरे आणि साखरेचा गोडसर स्वाद यामुळे हे पोहे हलक्या खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी करता येतात. गणपतीच्या प्रसादासाठीही हा कोकणी घरगुती पदार्थ एक वेगळा पर्याय ठरू शकतो.