

त्वचा अधिक तरुण आणि चमकदार दिसावी यासाठी सध्या बाजारात कोलेजन क्रीम आणि सप्लिमेंट्सची मागणी वाढताना दिसते. वाढत्या वयाबरोबर शरीरातील कोलेजनचे प्रमाण कमी होत असल्याने त्वचेवर बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे कोलेजन असलेली उत्पादने वापरल्याने त्वचा पुन्हा तरुण होईल, असा दावा केला जातो. मात्र, ही उत्पादने खरंच किती प्रभावी आहेत आणि त्यामागे वैज्ञानिक आधार किती आहे? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोलेजन क्रीम म्हणजे काय?
कोलेजन क्रीम म्हणजे त्वचेवर लावायची सौंदर्यप्रसाधने. यामध्ये कोलेजन किंवा कोलेजनशी संबंधित घटक असतात. त्वचा अधिक मऊ, ओलसर, गुळगुळीत आणि घट्ट दिसावी, यासाठी अशा क्रीमचा वापर केला जातो.
कोलेजन हे त्वचेला मजबुती आणि लवचिकता देणारे महत्त्वाचे प्रोटीन आहे. वय वाढताना शरीरातील कोलेजनचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होऊन बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसू शकतात. मात्र, क्रीममधील कोलेजन त्वचेच्या खोल थरांपर्यंत सहज पोहोचेलच असे नाही. त्यामुळे क्रीम लावल्याने शरीरातील कोलेजनची कमतरता थेट भरून निघते, असे समजणे योग्य नाही.
त्वचेसाठी कोलेजन महत्त्वाचे का?
मुंबईतील सैफी हॉस्पिटलचे कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट डॉ. प्रविण बनोडकर यांच्या मते, कोलेजन हे शरीरातील महत्त्वाचे प्रोटीन असून त्वचेची मजबुती आणि लवचिकता टिकवून ठेवण्यात त्याची भूमिका असते. त्वचेतील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासही ते मदत करते.
मात्र, वय वाढल्यानंतर शरीरातील कोलेजनचे प्रमाण हळूहळू कमी होते. यामुळे त्वचेवर बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसू लागतात.
कोलेजन क्रीम त्वचेच्या आत पोहोचते का?
बाजारात अनेक कोलेजन क्रीम उपलब्ध आहेत. मात्र, या क्रीम्सची एक महत्त्वाची मर्यादा म्हणजे कोलेजनचे रेणू आकाराने मोठे असतात. त्यामुळे ते त्वचेवरून लावल्यावर त्वचेच्या खोल थरांपर्यंत पोहोचतीलच असे नाही.
काही कंपन्या विशेष तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादनातील घटक त्वचेच्या आत पोहोचवण्याचा दावा करतात. मात्र, प्रत्येक कोलेजन क्रीममध्ये अशी क्षमता असेलच असे नाही.
क्रीमवर 'कोलेजन' लिहिले आहे म्हणजे परिणाम मिळेलच असे नाही
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणाऱ्या उत्पादनावर 'कोलेजन' असे लिहिले आहे म्हणून त्याचा अपेक्षित परिणाम मिळेलच असे नाही. क्रीममधील कोलेजन आणि त्वचेमध्ये प्रत्यक्ष कोलेजन तयार होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
त्वचेतील कोलेजन निर्मितीला चालना देण्यासाठी रेटिनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या काही घटकांना तुलनेने अधिक वैज्ञानिक आधार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
कोलेजन सप्लिमेंट्सचे काय?
तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या कोलेजन सप्लिमेंट्समध्ये प्रामुख्याने हायड्रोलाइज्ड कोलेजन किंवा कोलेजन पेप्टाइड्स असतात. पचनाच्या प्रक्रियेत हे घटक लहान पेप्टाइड्समध्ये विघटित होतात.
मात्र, सप्लिमेंट घेतल्यानंतर हे घटक थेट त्वचेत जाऊन कोलेजन म्हणून जमा होतात, असे सरळपणे म्हणता येत नाही. त्यामुळे अशा सप्लिमेंट्सकडून नेमके किती फायदे अपेक्षित आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
कोलेजन म्हणजे 'मॅजिक पिल' नाही
कोलेजन सप्लिमेंट्स घेतल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया थांबत नाही. तसेच सुरकुत्या पूर्णपणे नाहीशा होणे किंवा वृद्धत्वाची प्रक्रिया उलटी होणे शक्य नाही. त्यामुळे कोलेजन सप्लिमेंटला ‘मॅजिक पिल’ समजणे योग्य नाही.
मग कोलेजन केवळ मार्केटिंगचा ट्रेंड आहे का?
कोलेजन हे शरीरासाठी महत्त्वाचे प्रोटीन असून त्वचेच्या आरोग्यात त्याची भूमिका आहे. काही कोलेजन पेप्टाइड्समुळे त्वचेचा पोत आणि गुळगुळीतपणा सुधारण्यास मदत होऊ शकते. काही परिस्थितींमध्ये ते त्वचारोगाच्या उपचारांना पूरकही ठरू शकतात. मात्र, याचा अर्थ प्रत्येक उत्पादन प्रत्येक व्यक्तीवर समान परिणाम करेल, असा नाही.
कोलेजन उत्पादन घेताना काय लक्षात ठेवावे?
केवळ उत्पादनाच्या पॅकेजिंगवर 'कोलेजन' हा शब्द पाहून क्रीम किंवा सप्लिमेंट निवडू नये. त्यातील नेमके घटक काय आहेत, त्यांचा वैज्ञानिक आधार किती आहे आणि ते आपल्या त्वचेसाठी योग्य आहेत का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
योग्य त्वचासंवर्धनाची पद्धत आणि उत्पादनांची निवड करण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. कोलेजन उत्पादन वापरत असाल, तर त्याच्याकडून नेमके काय अपेक्षित ठेवायचे, हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.