

पावसाळ्यात पावसात भिजण्याचा आनंद अनेकांना हवाहवासा वाटत असतो. मात्र, याच पावसामुळे केस गळणे, टाळूला खाज येणे किंवा कोंडा वाढणे अशा समस्या जाणवू शकतात. यासाठी केवळ पावसाच्या पाण्याला जबाबदार धरता येणार नाही. पावसाचे पाणी जमिनीवर पोहोचेपर्यंत त्यात धूळ, प्रदूषण आणि हवेत असलेले विविध घटक मिसळू शकतात. त्यातच पावसाळ्यातील जास्त आर्द्रता आणि केस सतत ओले राहणे यामुळे टाळूच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
पावसाचं पाणी केसांसाठी खरंच खराब आहे का?
पावसाचं पाणी स्वतःहून केसांसाठी हानिकारक असेलच असे नाही. मात्र, वातावरणातील प्रदूषक आणि धुळीचे कण पावसाच्या पाण्यासोबत केस आणि टाळूवर जमा होऊ शकतात. यामुळे टाळूची नैसर्गिक स्थिती बिघडू शकते आणि खाज, कोरडेपणा किंवा अतिरिक्त तेलकटपणा जाणवू शकतो.
प्रदूषणामुळे टाळूवर परिणाम
पावसाच्या सुरुवातीच्या सरी वातावरणातील धूळ, धूर आणि इतर प्रदूषक कण खाली आणतात. हे घटक टाळूवर जमा झाल्यास त्याची नैसर्गिक स्थिती बिघडू शकते. परिणामी टाळूला खाज येणे, कोरडेपणा वाढणे किंवा तेलकटपणा जाणवणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शहरांमध्ये प्रदूषण जास्त असल्यास पावसात भिजल्यानंतर केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन का वाढतं?
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. ओलसर आणि दमट वातावरणामुळे टाळूवर बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. बोर्ड-सर्टिफाइड त्वचारोगतज्ज्ञ आणि Bodycraft Clinics च्या संस्थापक व मेडिकल डायरेक्टर डॉ. मिक्की सिंग यांच्या मते, पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनच्या समस्या उन्हाळ्याच्या तुलनेत वाढताना दिसतात.
केस ओले ठेवणे ठरू शकते मोठी चूक
पावसात भिजल्यानंतर केस बराच वेळ ओले ठेवणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्टच्या मते, ओलसर टाळूमुळे केसांच्या मुळांवर आणि केसांच्या शाफ्टवर ताण येऊ शकतो. त्यामुळे केस तुटण्याची शक्यता वाढते.
ओले केस बांधून ठेवू नका
भिजल्यानंतर केस लगेच घट्ट बांधणे किंवा ओल्या केसांवर हेल्मेट अथवा कॅप घालणे टाळावे. यामुळे टाळूवर ओलावा आणि घाम बराच वेळ अडकून राहतो. परिणामी बुरशी किंवा इतर टाळूच्या समस्यांना पोषक वातावरण मिळू शकते.
पावसात भिजल्यानंतर केसांची 'अशी' घ्या काळजी
पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर केस स्वच्छ पाण्याने धुवावेत. यामुळे केसांवर आणि टाळूवर जमा झालेले प्रदूषक कण दूर होण्यास मदत होते. केस हलक्या हाताने टॉवेलने पुसावेत आणि टाळू पूर्णपणे कोरडा होऊ द्यावा.
प्रत्येक वेळी शॅम्पू करणे गरजेचे नाही
पावसात भिजल्यानंतर प्रत्येक वेळी शॅम्पू करणे आवश्यक नाही. टाळू खूप तेलकट किंवा घाण झाल्यासच योग्य शॅम्पूचा वापर करावा. वारंवार शॅम्पू केल्याने काही लोकांच्या टाळूचा कोरडेपणा वाढू शकतो.
छोट्या सवयी ठेवा केस निरोगी
पावसाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी महागडी किंवा क्लिष्ट हेअर केअर रुटीन करण्याची गरज नाही. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुणे, टाळू व्यवस्थित कोरडा ठेवणे, ओले केस बांधून न ठेवणे आणि ओल्या केसांवर लगेच हेल्मेट किंवा कॅप न घालणे या साध्या सवयी केस आणि टाळूचे आरोग्य राखण्यास मदत करू शकतात.