उन्हाळा आला की सर्वात आधी परिणाम दिसतो तो आपल्या त्वचेवर. कडक ऊन, घाम आणि धुळीमुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. टॅनिंग, पिंपल्स आणि ऑइलिनेस या समस्या वाढतात आणि मग आपण महागडे स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरायला सुरुवात करतो. मात्र, त्यातील रसायने त्वचेला अधिक नुकसान पोहोचवू शकतात.
अशा वेळी घरच्या घरी तयार होणारे नैसर्गिक उपाय अधिक फायदेशीर ठरतात. काकडी आणि तुळस या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध असल्या तरी त्यांच्या त्वचेसाठी असलेल्या गुणधर्मांकडे अनेकदा दुर्लक्ष होतं.
काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने ती त्वचेला हायड्रेट ठेवते आणि थंडावा देते. तर तुळशीतील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स कमी करण्यात मदत करतात. या दोघांचा एकत्रित वापर केल्यास चेहरा अधिक स्वच्छ, फ्रेश आणि टवटवीत दिसू शकतो.
काकडी-तुळशीचा टोनर कसा तयार कराल?
यासाठी एक मध्यम आकाराची काकडी, १० ते १२ तुळशीची पाने, २ ते ३ चमचे गुलाब पाणी आणि अर्धा चमचा लिंबाचा रस लागतो.
सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून साल काढा आणि किसून तिचा रस गाळून घ्या. त्यानंतर तुळशीची पाने धुवून हलकी कुस्करून त्यांचा रस तयार करा. आता काकडीचा आणि तुळशीचा रस एकत्र करून त्यात गुलाब पाणी आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण नीट ढवळून स्वच्छ स्प्रे बाटलीत भरून ठेवा.
वापरताना चेहरा आधी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा किंवा कापसाने लावा. ते पुसू नका, नैसर्गिकरित्या त्वचेत शोषू द्या.
या टोनरचे फायदे :
त्वचेला नैसर्गिक थंडावा मिळतो.
टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
पिंपल्स आणि सूज कमी करण्यात उपयोगी.
त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित होतं.
मोठी छिद्रं (pores) लहान दिसू लागतात.
त्वचा अधिक फ्रेश आणि टवटवीत दिसते.
नियमित वापराने नैसर्गिक ग्लो मिळतो.
उन्हाळ्यात महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी हा सोपा आणि नैसर्गिक उपाय करून पाहा आणि त्वचेला द्या कूल, फ्रेश लूक.
(Disclaimer : या लेखातील माहिती ही सामान्य माहिती व घरगुती उपायांवर आधारित आहे. ‘नवशक्ति’ या उपायांच्या परिणामकारकतेची हमी देत नाही. कोणताही उपाय वापरण्यापूर्वी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)