

दिवाळी संपली तरी अजून एक दिवाळी बाकी आहे, 'देव दिवाळी'! दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा दिवस ‘देवांची दिवाळी’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी भगवान शिवाची पूजा करून दिवे लावण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, या दिवशी दिवे लावल्याने सर्व दुःख, आजार आणि संकट दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.
पंचांगानुसार, यंदा कार्तिक पौर्णिमा तिथी ४ नोव्हेंबर रात्री १०:३६ पासून ते ५ नोव्हेंबर संध्याकाळी ६:४८ पर्यंत असेल. त्यामुळे देव दिवाळी बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरी केली जाईल.
या दिवशी प्रदोष काळात दिवे लावणे सर्वात शुभ मानले जाते.
शुभ वेळ: संध्याकाळी ५:१५ ते ७:५०
एकूण शुभ काळ: २ तास ३५ मिनिटे
या वेळेत दिवे लावल्याने पुण्यप्राप्ती होते, असे मानले जाते.
देव दिवाळीच्या दिवशी ११, २१, ५१ किंवा १०८ दिवे लावण्याची परंपरा आहे. श्रद्धेनुसार आपण यापेक्षा अधिक दिवेही लावू शकता.
असं म्हटलं जातं की, या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून त्रिलोकात शांतता निर्माण केली होती. या घटनेच्या स्मरणार्थ देव दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे.
म्हणून या ५ नोव्हेंबरला प्रदोष काळात दिवे लावा आणि घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि शिवकृपेचा प्रकाश पसरवा!
