

आजच्या बैठ्या जीवनशैलीमुळे वजन वाढणे ही सामान्य समस्या बनली आहे. अनेकदा शरीर बारीक असले तरी गळ्याभोवती आणि हनुवटीखाली चरबी साचल्याने चेहरा जाड दिसू लागतो. त्यामुळे आत्मविश्वासावरही परिणाम होऊ शकतो. मात्र काही साधे आणि नियमित व्यायाम केल्यास गळ्याभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून फक्त काही मिनिटे दिल्यास मान आणि जॉ लाईन अधिक टोन दिसू शकते.
गळ्याभोवतीची चरबी कमी करण्यासाठी सोपे व्यायाम
१. वर-खाली मान हलवण्याचा व्यायाम
ताठ बसून हळूहळू मान वर उचला आणि छताकडे काही सेकंद पाहा. त्यानंतर मान खाली झुकवून जमिनीकडे पाहा. हा व्यायाम १० वेळा करा. यामुळे मान आणि हनुवटीभोवतीचे स्नायू सक्रिय होतात.
२. उजवी-डावी मान फिरवा
मान हळूहळू उजव्या बाजूला आणि नंतर डाव्या बाजूला फिरवा. हा व्यायामही १० वेळा करा. यामुळे मान लवचिक राहण्यास मदत होते.
३. खांद्याकडे मान झुकवणे
मान डाव्या खांद्याकडे झुकवून डावा कान खांद्याला लावण्याचा प्रयत्न करा. नंतर उजव्या बाजूनेही तेच करा. दोन्ही बाजूंनी १०-१० वेळा हा व्यायाम करा.
४. मान गोल फिरवणे
मान क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने प्रत्येकी ५ वेळा फिरवा. यामुळे मान आणि हनुवटीभोवतीचे स्नायू मजबूत होतात.
५. हनुवटी-मान स्ट्रेच
हनुवटी गळ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करा आणि डोके उजव्या बाजूने फिरवत मागे पाहा. नंतर डाव्या बाजूनेही तेच करा. हा व्यायाम ५-५ वेळा करा.
नियमितपणे केल्यास होऊ शकतो फायदा
हे साधे व्यायाम दररोज केल्यास गळ्याभोवती साचलेली चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच मान लवचिक राहते आणि चेहऱ्याचा आकार अधिक स्पष्ट दिसू लागतो. व्यायामासोबत संतुलित आहार आणि नियमित हालचाल ठेवली तर परिणाम अधिक चांगले दिसू शकतात.