Dussehra 2026 : दसऱ्याला शस्त्रपूजनासाठी अवघ्या ४७ मिनिटांचा शुभ मुहूर्त! विजयादशमीची तिथी, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या

यंदा दसऱ्याला शस्त्रपूजनासाठी अवघ्या ४७ मिनिटांचा शुभ मुहूर्त आहे. जाणून घ्या विजयादशमीची तिथी, शस्त्रपूजनाची वेळ, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व.
Dussehra 2026 : दसऱ्याला शस्त्रपूजनासाठी अवघ्या ४७ मिनिटांचा शुभ मुहूर्त! विजयादशमीची तिथी, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या
Published on: 

नवरात्रीच्या उत्सवानंतर साजऱ्या होणाऱ्या विजयादशमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यंदा दसरा मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी शस्त्रपूजन, वाहनपूजन आणि आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे यंदा विजय मुहूर्ताचा कालावधी अवघ्या ४७ मिनिटांचा आहे. त्यामुळे शस्त्रपूजन नेमके कोणत्या वेळी करावे, दशमी तिथी कधी सुरू होणार आणि रावण दहनासाठी कोणता काळ शुभ मानला जातो, हे जाणून घेऊया.

दसरा २०२६ : दशमी तिथी कधी सुरू होणार?

पंचांगानुसार, आश्विन शुक्ल दशमी तिथीची सुरुवात मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी होणार आहे. ही तिथी बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून ११ मिनिटांपर्यंत राहणार आहे. महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांत २० ऑक्टोबरला विजयादशमी साजरी केली जाईल. मात्र काही प्रदेशांत स्थानिक परंपरेनुसार २१ ऑक्टोबरलाही विजयादशमीचे विधी केले जाणार आहेत.

Dussehra 2026 : दसऱ्याला शस्त्रपूजनासाठी अवघ्या ४७ मिनिटांचा शुभ मुहूर्त! विजयादशमीची तिथी, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या
दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स

शस्त्रपूजनासाठी अवघ्या ४७ मिनिटांचा शुभ मुहूर्त

दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजनाला विशेष महत्त्व दिले जाते. मुंबईसाठी द्रिक पंचांगानुसार, यंदाचा विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १९ मिनिटांपासून ३ वाजून ०६ मिनिटांपर्यंत आहे. हा कालावधी अवघ्या ४७ मिनिटांचा असून, या शुभ मुहूर्तावर शस्त्रपूजन करता येईल. तसेच दुपारी १ वाजून ३३ मिनिटांपासून ३ वाजून ५३ मिनिटांपर्यंत अपराह्न पूजेचा मुहूर्त आहे. या काळातही पारंपरिक पूजाविधी करता येतात.

दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन कसे करावे?

विजयादशमीच्या दिवशी सकाळी घराची स्वच्छता करून प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. घरासमोर रांगोळी काढून देवघरात दिवा लावला जातो. त्यानंतर घरातील शस्त्रे, वाहने, व्यवसायाची साधने आणि दैनंदिन कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची पूजा केली जाते.

पूजेसाठी वस्तू स्वच्छ करून त्यांना हळद-कुंकू, फुले आणि अक्षता वाहिल्या जातात. काही घरांमध्ये नारळ, फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. विद्यार्थी या दिवशी पुस्तके, वह्या, लेखनसाहित्य आणि शैक्षणिक साधनांचेही पूजन करतात. या परंपरेतून आपल्या ज्ञानाचा आणि कामाच्या साधनांचा आदर व्यक्त केला जातो.

Dussehra 2026 : दसऱ्याला शस्त्रपूजनासाठी अवघ्या ४७ मिनिटांचा शुभ मुहूर्त! विजयादशमीची तिथी, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या
Dussehra 2026 : दसऱ्याला घराला द्या पारंपरिक लूक; सजावटीच्या 'या' भन्नाट आयडिया नक्की ट्राय करा

रावण दहनासाठी कोणता काळ शुभ?

दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची परंपरा देशातील अनेक भागांत पाळली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतरचा प्रदोषकाळ रावण दहनासाठी शुभ मानला जातो. त्यामुळे मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी स्थानिक सूर्यास्तानंतर रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. प्रदोषकाळाची अचूक वेळ शहरानुसार बदलते.

दसऱ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

विजयादशमी हा सण चांगल्याचा वाईटावर झालेला विजय दर्शवतो. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केला, तर देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला. या विजयाच्या स्मरणार्थ दसरा साजरा केला जातो.

महाराष्ट्रात या दिवशी आपट्याची पाने 'सोने' म्हणून एकमेकांना देण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी शमीवृक्षाचे पूजन, सीमोल्लंघन आणि नवीन कामाची सुरुवात केली जाते. दसरा हा केवळ धार्मिक उत्सव नसून परस्परांना शुभेच्छा देण्याचा, नाती दृढ करण्याचा आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्याचा दिवस मानला जातो.

logo
marathi.freepressjournal.in