

सध्या तरुणांपासून लहान मुलांपर्यंत पास्ताची क्रेझ वाढताना दिसत आहे. विशेषतः पास्ता हा प्रकार कमी वेळेत तयार होणारा, चवदार आणि मसालेदार असल्यामुळे घराघरांत लोकप्रिय ठरत आहे. भाज्यांचे योग्य प्रमाण, सॉसची चव आणि मसाल्यांचा तडका यामुळे पास्ताची चव अधिक लज्जतदार होते. महागड्या हॉटेलमध्ये जाण्याऐवजी आता अनेक जण पास्ता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवत आहेत. चला तर जाणून घेऊया मसाला पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य :
पास्ता - १ कप (उकडलेला)
तेल किंवा बटर - २ टेबलस्पून
कांदा - १ बारीक चिरलेला
टोमॅटो - १ बारीक चिरलेला
शिमला मिरची - अर्धा कप
गाजर - अर्धा कप
हिरवी मिरची - १ बारीक चिरलेली
लसूण - १ टीस्पून (चिरलेला)
रेड चिली सॉस - १ टेबलस्पून
टोमॅटो केचप - २ टेबलस्पून
सोया सॉस - १ टीस्पून
मीठ - चवीनुसार
धणेपूड - अर्धा टीस्पून
लाल तिखट - अर्धा टीस्पून
मिक्स हर्ब्स / ओरिगॅनो - अर्धा टीस्पून
किसलेले चीज - आवडीनुसार
कृती :
सर्वप्रथम कढईत तेल किंवा बटर गरम करा. त्यात लसूण आणि हिरवी मिरची टाकून थोडे परतून घ्या. नंतर त्यात कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परतवा. कांदा मऊ झाल्यावर टोमॅटो घालून मिश्रण व्यवस्थित शिजू द्या. टोमॅटो मऊ झाल्यावर शिमला मिरची आणि गाजर घालून २ ते ३ मिनिटे परतून घ्या.
यानंतर रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि सोया सॉस घालून सर्व साहित्य नीट मिसळा. आता मीठ, धणेपूड, लाल तिखट आणि मिक्स हर्ब्स घालून एकत्र ढवळा. शेवटी उकडलेला पास्ता घालून मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे परतवा. पास्ता सॉसमध्ये नीट मिक्स झाल्यावर गॅस बंद करा. वरून चीज टाकून गरमागरम मसाला पास्ता सर्व्ह करा.
टिप्स :
पास्ता जास्त शिजवू नका, नाहीतर तो चिकट होतो.
लहान मुलांसाठी तिखटचे प्रमाण कमी ठेवा.
चव वाढवण्यासाठी बटरचा वापर करा.
भाज्यांमध्ये स्वीट कॉर्न किंवा ब्रोकलीही घालू शकता.
चीज नसेल तरीही पास्ता चवदार लागतो.