

दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या जेवणात काहीतरी हटके आणि स्वादिष्ट असावं, असं अनेकांना वाटत असतं. अशावेळी फ्रिजमध्ये फारसं काही नसलं, तरी अंडी असली तर मग कामच झालं समजा.. झटपट, झणझणीत असा 'अंडा मसाला' खाऊन पोट तर भरेलच आणि जेवण्याचं समाधानही मिळेल. चला जाणून घेऊया सोपी रेसिपी.
साहित्य :
अंडी - ४ (उकडलेली)
कांदा - २ (बारीक चिरलेला)
टोमॅटो - २ (बारीक चिरलेले किंवा प्युरी)
आलं-लसूण पेस्ट- १ चमचा
हळद - अर्धा चमचा
तिखट - १ चमचा (चवीनुसार)
गरम मसाला - अर्धा चमचा
धने-जिरे पूड - १ चमचा
तेल - २ चमचे
मीठ - चवीनुसार
कोथिंबीर - सजावटीसाठी
पाणी - आवश्यकतेनुसार
कृती :
प्रथम कढईत तेल तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतावा. कांदा मऊ झाला की त्यात आलं-लसूण पेस्ट घालून नीट परतून घ्यावे. त्यानंतर टोमॅटो घालून मिश्रण तेल सुटेपर्यंत शिजवावे.
आता हळद, तिखट, धणे-जिरे पूड, गरम मसाला आणि मीठ घालून मसाला छान परतून घ्यावा. गरज भासल्यास थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही तयार करावी. शेवटी उकडलेली अंडी मध्ये कापून मसाल्यात सोडावीत आणि मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजू द्यावी. वरून कोथिंबीर पसरून गरमागरम अंडा मसाला तयार!
टिप :
रात्रीच्या भाजीला हा अंडा मसाला पोळी, भाकरी किंवा साध्या भातासोबत अप्रतिम लागतो. कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ आजच्या धावपळीच्या जीवनात बेस्ट ऑप्शन आहे.