Flower Chilli Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत आणि हटके बनवायचं असेल तर फ्लॉवर चिली हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मंचुरियन किंवा चिकन चिली अनेकदा खाल्ली असेल, पण फ्लॉवरपासून बनणारी ही स्पायसी आणि चविष्ट डिशही तितकीच स्वादिष्ट लागते. कुरकुरीत तळलेला फ्लॉवर, त्यावर सॉसचा मसालेदार तडका आणि भाज्यांचा खमंग स्वाद यामुळे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.
पार्टी स्नॅक्स, वीकेंड स्पेशल मेन्यू किंवा जेवणात साइड डिश म्हणूनही फ्लॉवर चिली सर्व्ह करता येते. विशेष म्हणजे ही रेसिपी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये अगदी सहज तयार होते. त्यामुळे यावेळी नेहमीच्या फ्लॉवरच्या भाजीऐवजी हा चायनीज ट्विस्ट नक्की ट्राय करा.
फ्लॉवर चिलीसाठी लागणारे साहित्य
१ मध्यम आकाराचा फ्लॉवर
३ टेबलस्पून मैदा
२ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
१ टीस्पून आले-लसूण पेस्ट
१ टीस्पून लाल तिखट
अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी
तळण्यासाठी तेल
१ कांदा (चौकोनी कापलेला)
१ ढोबळी मिरची (चौकोनी कापलेली)
२ हिरव्या मिरच्या
१ टेबलस्पून सोया सॉस
१ टेबलस्पून चिली सॉस
१ टेबलस्पून टोमॅटो सॉस
१ टीस्पून व्हिनेगर
स्प्रिंग अनियन सजावटीसाठी
फ्लॉवर चिली बनवण्याची कृती
सर्वप्रथम फ्लॉवरचे छोटे तुकडे करून स्वच्छ धुवून घ्या. गरम पाण्यात थोडे मीठ घालून काही मिनिटे ठेवून नंतर पाणी पूर्णपणे काढून टाका.
आता एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, काळी मिरी पावडर आणि मीठ एकत्र करा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम घट्टसर बॅटर तयार करा.
फ्लॉवरचे तुकडे या बॅटरमध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
यानंतर दुसऱ्या कढईत थोडे तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, कांदा आणि ढोबळी मिरची हलक्या आचेवर परतून घ्या. भाज्या जास्त मऊ होणार नाहीत याची काळजी घ्या.
त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि व्हिनेगर घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. आता तळलेला फ्लॉवर त्यात घालून मोठ्या आचेवर एक-दोन मिनिटे परता.
शेवटी वरून बारीक चिरलेला स्प्रिंग अनियन घाला आणि गरमागरम फ्लॉवर चिली सर्व्ह करा.