

संध्याकाळ झाली की मुलांना काहीतरी गोड किंवा चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी प्रत्येक वेळी बाहेरून केक, बिस्किटं किंवा पॅकेज्ड पदार्थ आणण्यापेक्षा घरच्या घरी सोपा आणि चविष्ट पर्याय तयार करता येतो. विशेष म्हणजे या केकसाठी ओव्हनचीही गरज नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या बिस्किटांपासून कुकरमध्ये मऊ आणि स्वादिष्ट केक बनवता येतो.
केकचं मिश्रण तयार करण्यासाठी अवघी काही मिनिटं लागतात. त्यानंतर कुकरमध्ये तो व्यवस्थित शिजवला की मुलांसाठी खास घरगुती बिस्कीट केक तयार होतो.
बिस्कीट केकसाठी लागणारं साहित्य
आवडीनुसार बिस्किटं
साखर
दूध
बेकिंग पावडर
व्हॅनिला इसेन्स किंवा वेलची पूड
बटर
बिस्कीट केक बनवण्याची कृती
सर्वप्रथम आवडीची बिस्किटं मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यांची बारीक पूड करून घ्या. साखरही स्वतंत्रपणे बारीक वाटून घ्या.
आता कुकर मंद आचेवर गरम होण्यासाठी ठेवा. कुकरचं झाकण लावण्यापूर्वी त्याची शिट्टी आणि रबर काढून ठेवणं आवश्यक आहे.
बिस्किटांची पूड एका भांड्यात काढा. त्यात वाटलेली साखर घाला. नंतर थोडं-थोडं दूध टाकत मिश्रण व्यवस्थित ढवळा. मिश्रण खूप पातळ होणार नाही, याची काळजी घ्या.
त्यात व्हॅनिला इसेन्स किंवा वेलची पूड घालून पुन्हा एकदा नीट मिसळा. हे मिश्रण काही मिनिटं बाजूला ठेवा.
केकचं मिश्रण कुकरमध्ये ठेवण्यापूर्वी त्यात बेकिंग पावडर घाला आणि हलक्या हाताने एकत्र करा.
केकचं भांडं बटरने ग्रीस करून त्यात तयार मिश्रण ओता. हे भांडं आधीपासून गरम केलेल्या कुकरमध्ये ठेवा आणि मंद आचेवर साधारण ३० ते ३५ मिनिटं शिजू द्या.
केक तयार झाला की नाही, कसं ओळखाल?
केकमध्ये सुरी किंवा टूथपिक घालून पाहा. ती स्वच्छ बाहेर आली, तर केक व्यवस्थित शिजला आहे. कुकरमधून भांडं बाहेर काढून काही वेळ थंड होऊ द्या. त्यानंतर केकचे तुकडे करून सर्व्ह करा.
अशा प्रकारे फारसं साहित्य किंवा ओव्हन न वापरता घरच्या घरी मुलांच्या आवडीचा मऊ बिस्कीट केक सहज तयार करता येतो.