

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामाची धावपळ, ऑफिसमध्ये तासन् तास बसून काम करणं, मोबाईलचा वाढता वापर आणि अपुरी झोप... या सगळ्यामुळे अनेकांना दिवसभर थकल्यासारखं वाटतं. विशेष म्हणजे, दिवसातून तीन वेळा पोटभर जेवूनही काहींना सतत आळस, अशक्तपणा आणि शरीरात ऊर्जा नसल्यासारखं जाणवतं. मात्र, भरपूर जेवण केलं म्हणजे शरीराला आवश्यक पोषण मिळतंच असं नाही. आपल्या रोजच्या काही सवयींमुळेही थकवा वाढू शकतो. त्यामुळे सतत थकवा जाणवत असेल, तर त्यामागची कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे.
चेन्नईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या अंतर्गत औषधोपचार तज्ज्ञ डॉ. सौम्या मुरलीकुमारन यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या आरोग्यविषयक माहितीनुसार, आहार, झोप, मानसिक ताण आणि शारीरिक हालचाली या गोष्टी शरीराच्या ऊर्जेवर परिणाम करू शकतात. जाणून घेऊया थकवा जाणवण्यामागची चार संभाव्य कारणं.
पोटभर जेवूनही थकवा का जाणवतो? ही आहेत ४ संभाव्य कारणं
१. आहारात पोषक घटकांची कमतरता
दिवसातून तीन वेळा जेवलं म्हणजे शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतातच असं नाही. रोजच्या आहारात मैदा, गोड पदार्थ आणि जंक फूडचं प्रमाण जास्त असेल, तर पौष्टिक पदार्थ कमी खाल्ले जाऊ शकतात. शरीरात लोह, जीवनसत्त्व बी-१२ किंवा इतर आवश्यक पोषक घटकांची कमतरता असल्यास थकवा जाणवू शकतो. त्यामुळे आहारात डाळी, कडधान्यं, पालेभाज्या, फळं, दूध आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं.
२. अपुरी आणि अनियमित झोप
रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, रोज वेगवेगळ्या वेळी झोपणं आणि पुरेशी झोप न घेणं याचा शरीरावर परिणाम होतो. झोप पूर्ण झाली नाही, तर सकाळी उठल्यापासूनच थकल्यासारखं वाटू शकतं. दिवसभर आळस येणं आणि कामात लक्ष न लागणं अशा समस्याही जाणवू शकतात. त्यामुळे रोज ठरावीक वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावावी. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करणंही उपयोगी ठरू शकतं.
३. सततचा मानसिक ताण
ऑफिसमधील कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या किंवा इतर चिंतांमुळे मनावर सतत दबाव राहू शकतो. याचा परिणाम झोपेवर आणि एकूण आरोग्यावर होतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवू शकतो. अशावेळी कामाच्या दरम्यान छोटे ब्रेक घेणं, आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढणं आणि श्वसनाचे व्यायाम करणं फायदेशीर ठरू शकतं.
४. शारीरिक हालचालींचा अभाव
दिवसभर ऑफिसमध्ये किंवा घरी एकाच जागी बसून काम केल्याने शरीराची हालचाल कमी होते. नियमित व्यायामाचा अभाव असल्यास शरीराची सहनशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे रोजची साधी कामं करतानाही लवकर थकवा जाणवू शकतो. यासाठी नियमित चालणं, स्ट्रेचिंग किंवा आपल्या क्षमतेनुसार हलका व्यायाम करण्याची सवय लावावी. सुरुवातीला कमी वेळ व्यायाम करून हळूहळू त्याचा कालावधी वाढवता येतो.
दिवसभर उत्साही राहण्यासाठी काय कराल?
रोजच्या आहारात फळं, भाज्या, डाळी, कडधान्यं आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
झोपण्याची आणि उठण्याची वेळ शक्यतो निश्चित ठेवा.
दररोज आपल्या क्षमतेनुसार चालण्याचा किंवा व्यायामाचा प्रयत्न करा.
कामाच्या दरम्यान छोटे ब्रेक घ्या आणि एकाच जागी सतत बसणं टाळा.
मानसिक ताण कमी करण्यासाठी विश्रांती आणि श्वसनाच्या व्यायामांसाठी वेळ काढा.
सततच्या थकव्याकडे दुर्लक्ष करू नका!
थकवा येण्यामागे केवळ चुकीच्या सवयीच कारणीभूत असतात असं नाही. काही वेळा रक्तक्षय, थायरॉईडचे विकार, मधुमेह किंवा झोपेशी संबंधित समस्यांमुळेही सतत थकल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेऊनही अनेक दिवस थकवा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरजेनुसार डॉक्टर रक्तातील साखर, हिमोग्लोबिन किंवा इतर तपासण्या सुचवू शकतात.
(डिस्क्लेमर : या लेखातील माहिती उपलब्ध वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यावर आधारित आहे. दिलेल्या माहितीचा परिणाम प्रत्येकाच्या शारीरिक स्थितीनुसार वेगवेगळा असू शकतो. या माहितीच्या अचूकतेची किंवा उपायांच्या परिणामांची नवशक्ती हमी देत नाही. कोणताही उपाय किंवा उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)