

रोजच्या स्वयंपाकात काय नवीन करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. घरच्यांच्या डब्यात काहीतरी बदल हवा असतो, पण वेळ मात्र कमी! अशा वेळी भेंडीसारखी झटपट होणारी आणि सगळ्यांच्या आवडीची भाजी उपयोगी ठरते. भेंडी ही पौष्टिक, हलकी आणि पचायला सोपी असल्याने ती मुलं, मोठे, सगळ्यांनाच आवडते. पण दरवेळी तीच परतलेली भेंडी दिली तर कंटाळा येतो. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत भेंडीच्या पाच वेगवेगळ्या आणि स्वादिष्ट रेसिपी. ज्या डब्यात, जेवणात किंवा खास प्रसंगीही एकदम परफेक्ट ठरतील.
साहित्य: भेंडी, तेल, मोहरी, हळद, मिरची पूड, मीठ
कृती: भेंडी धुवायची नाही, फक्त ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्या. पातळ गोल चिरा. कढईत तेल गरम करून मोहरी टाका, नंतर हळद आणि मिरची पूड घाला. त्यात गोल चिरलेली भेंडी टाकून मंद आचेवर परता. भेंडी कुरकुरीत झाली की शेवटी मीठ घाला.
टिप: भेंडी तव्यावर शिजवली तर अजून कुरकुरीत आणि चविष्ट लागते.
.................
साहित्य: भेंडी, खोबरे, गूळ, दाण्याचे कुट, मसाले, चिंच, मीठ
कृती: भरली भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम भेंडी मधोमध चिरा करा. नारळ, गूळ, दाण्याचे कुट, लाल तिखट, आणि मीठ एकत्र करून भरड मिश्रण तयार करा. ते मिश्रण भेंड्यांमध्ये भरा. कढईत तेल गरम करून त्या भेंड्या हळूहळू परता. झाकण ठेवून मंद गॅसवर वाफवून घ्या.
टिप: गोड आवडत नसेल तर नारळ-कांद्याचं वाटण वापरूनही हीच रेसिपी करता येते.
.................
साहित्य: भेंडी, ताक, हळद, हिरवी मिरची, मीठ, तेल
कृती: भेंडी नेहमीप्रमाणे परतून घ्या. गॅस बंद करून त्यात ताक घाला. थोडी हळद, मीठ, आणि चिरलेल्या मिरच्या टाका. त्यानंतर मंद आचेवर एक उकळी द्या आणि लगेच गॅस बंद करा.
टिप: ताक घालताना गॅस बंद ठेवला तर ताक फाटत नाही आणि चव टिकून राहते.
.................
साहित्य: भेंडी, कांदा, लसूण, टोमॅटो, मसाला, तेल
कृती: भेंडी मधोमध चिरून कुरकुरीत तळून घ्या. वेगळ्या कढईत कांदा, लसूण आणि टोमॅटो परतून मसाला तयार करा. त्यात तळलेली भेंडी घालून काही मिनिटे परता.
टिप: ही भाजी थोडी मसालेदार होते. 
.................
साहित्य: भेंडी, बटाटे, कांदा, मसाले, तेल, मीठ
कृती: कढईत तेल गरम करून त्यात कांदा परता. बटाट्याचे तुकडे घालून काही वेळ परता, मग भेंडी आणि मसाले घाला. झाकण ठेवून मंद गॅसवर वाफवून घ्या.
टिप: डब्यासाठी ही भाजी परफेक्ट! मोजके मसाले आणि साधेपणामुळे ही भाजी रोज खाल्ली तरी कंटाळा येत नाही.
भेंडी ही इतकी बहुगुणी भाजी आहे की तिचं प्रत्येक रूप चविष्ट वाटतं. या पाच रेसिपींपैकी कोणतीही करून पाहा आणि रोजच्या जेवणात साधेपणातली चव अनुभवायला मिळेल.