Ganeshotsav 2025 : बाप्पाला दुर्वा का प्रिय आहेत? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा आणि महत्व

तुम्हाला माहिती आहे का, बाप्पाला दुर्वा इतक्या का प्रिय आहेत? यामागे एक रोचक पौराणिक कथा दडलेली आहे. अनलासुर नावाचा राक्षस होता, ज्याने...
Ganeshotsav 2025 : बाप्पाला दुर्वा का प्रिय आहेत? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा आणि महत्व
Published on

दहीहंडीचा जल्लोष संपताच आता सर्वत्र बाप्पाच्या येण्याची लगबग सुरू झाली आहे. अवघ्या दहा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, येत्या २७ ऑगस्टला लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंडप सजावट, मूर्तींची खरेदी आणि आरास यांच्या तयारीमुळे वातावरणात उत्साह दाटून आलाय. या सोहळ्यात बाप्पाला प्रिय असलेले मोदक आणि दुर्वा अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, बाप्पाला दुर्वा इतक्या का प्रिय आहेत? यामागे एक रोचक पौराणिक कथा दडलेली आहे.

गणपतीला दुर्वा प्रिय होण्यामागची पौराणिक कथा

अनलासुर नावाचा राक्षस होता, ज्याने पृथ्वी व स्वर्गात दहशत निर्माण केली होती. त्याच्या भीतीने देव-ऋषींनी भगवान शंकराकडे धाव घेतली. मात्र शंकरांनी सांगितलं की, अनलासुराचा वध फक्त श्रीगणेशच करू शकतो. त्यानंतर गणेशाने राक्षसाचा नाश करण्यासाठी त्याला गिळलं. पण त्यानं बाप्पाच्या पोटात तीव्र जळजळ सुरू झाली आणि संपूर्ण शरीराचा दाह होऊ लागला. कितीही उपाय करूनही आराम मिळेना. तेव्हा ऋषी कश्यपांनी दुर्वाच्या २१ जुड्या श्रीगणेशाला अर्पण केल्या. लगेचच बाप्पाच्या पोटातील दाह शमला. त्यानंतरपासून गणेशाला दुर्वा प्रिय ठरल्या.

दुर्वांच महत्त्व : आयुर्वेद, पूजाविधी आणि लोकमान्यता

गणेशपूजेत दुर्वेला असं खास स्थान का आहे, यामागे केवळ पौराणिक कथा नाही तर आयुर्वेद आणि लोकमान्यताही जोडलेल्या आहेत. आयुर्वेदानुसार दुर्वेला थंडावा देणारे, रक्तशुद्धी करणारे आणि औषधी गुणधर्म लाभलेले आहेत. म्हणूनच अनलासुराची कथा सांगते तसं, बाप्पाच्या पोटातील दाह शमवण्यासाठी दुर्वा प्रभावी ठरल्या.

पूजाविधीच्या दृष्टीने पाहिलं तर गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा फार महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे २१ जुड्या दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे. प्रत्येक जुडीत ३ पाने असतात आणि ती सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचं प्रतीक मानली जातात. या त्रिगुणांच्या संतुलनातून जीवन अधिक सुखकर आणि संतुलित होतं, असा समज आहे.

Ganeshotsav 2025 : बाप्पाला दुर्वा का प्रिय आहेत? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा आणि महत्व
Sugar Free Rabdi Recipe: गणेशोत्सवात बनवा शुगर फ्री रबडी, मधुमेही रुग्णांसाठी आहे बेस्ट; नोट करा रेसिपी

याचबरोबर दुर्वा हे शुभ चिन्हही मानलं जातं. सातत्य, प्रगती आणि दीर्घायुष्याचं प्रतीक असलेली ही वनस्पती बाप्पाला अर्पण करताना भक्त ‘आरोग्य, आयुष्य आणि समृद्धी’ मिळावी अशी मनोमन प्रार्थना करतात. अनेक लोकमान्यतानुसार घरात दुर्वा लावल्यानेही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वातावरण प्रसन्न राहतं. त्यामुळेच गणेशपूजेत दुर्वेचं महत्त्व पौराणिक, धार्मिक आणि आयुर्वेदिक अशा तिन्ही पातळ्यांवर अधोरेखित केलं गेलं आहे.

(Disclaimer: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)


logo
marathi.freepressjournal.in