गणेशोत्सव म्हटलं की बाप्पासाठी रोज काहीतरी खास नैवेद्य करण्याची लगबग सुरू होते. मोदक, खीर, लाडू यांसोबत यंदा पारंपरिक कोकणी पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर रस-शिरवळे नक्की करून पाहा. तांदळाच्या पीठापासून तयार केलेल्या मऊसूत शिरवळ्यांवर नारळ आणि गुळाचा गोड रस ओतून हा पदार्थ वाढला जातो. कोकणातील अनेक घरांमध्ये सणासुदीला केला जाणारा हा पदार्थ चवीला खास असून तयार करण्याची पद्धतही फार अवघड नाही.
नारळ-गुळाचा रस करण्यासाठी साहित्य
ओला नारळाचा किस - १ वाटी
जिरे - १ टीस्पून
हळद - १ टीस्पून
गूळ - १ कप
पाणी - आवश्यकतेनुसार
शिरवळ्यांसाठी साहित्य
तांदळाचं पीठ - १ कप
पाणी - १ कप
तूप - १ टीस्पून
मीठ - चवीनुसार
रस-शिरवळे कसे बनवायचे?
१. आधी तयार करा नारळ-गुळाचा रस
मिक्सरमध्ये नारळाचा किस, जिरे, हळद आणि थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. हे मिश्रण बारीक चाळणी किंवा स्वच्छ कापडातून गाळून घट्ट नारळाचा रस काढा. त्यात गूळ घालून मंद आचेवर गरम करा. गूळ पूर्ण वितळल्यानंतर रस बाजूला ठेवा.
२. तांदळाच्या पिठाची उकड काढा
पातेल्यात पाणी, तूप आणि मीठ घालून उकळी आणा. पाणी उकळल्यानंतर त्यात तांदळाचं पीठ घाला. गॅस मंद करून पीठ नीट ढवळा. झाकण ठेवून काही मिनिटं वाफ येऊ द्या.
३. उकड मऊसर मळून घ्या
उकड थोडी गरम असतानाच हाताला पाणी लावून ती मऊसर मळून घ्या. त्याचे लांबट गोळे करून शिरवळ्याच्या साच्यात भरा. साच्याने केळीच्या पानावर किंवा ताटावर शिरवळे पाडून घ्या.
४. शिरवळ्यांना वाफ द्या
तयार केलेले शिरवळे मोदकपात्रात किंवा वाफवण्याच्या भांड्यात साधारण ५ ते ७ मिनिटं वाफवून घ्या. यामुळे शिरवळे मऊ राहतात आणि एकमेकांना चिकटण्याची शक्यता कमी होते.
मऊसूत शिरवळ्यांसाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
तांदळाच्या पिठाची उकड व्यवस्थित होणं हा या पदार्थातील महत्त्वाचा टप्पा आहे. उकड खूप कोरडी राहिल्यास शिरवळे तुटू शकतात, तर मळताना योग्य प्रमाणात पाणी वापरल्यास ती मऊ राहते. शिरवळे साच्यातून काढल्यानंतर वाफवून घेणंही महत्त्वाचं आहे.
तयार गरम शिरवळ्यांवर नारळ-गुळाचा रस ओतून वाढा. कोकणातील पारंपरिक चवीचा हा गोड पदार्थ गणेशोत्सवाच्या नैवेद्यासाठी नक्कीच खास ठरू शकतो.