
सुक्या मेव्याचं नियमित सेवन शरीराला ताकद देतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. बदाम, काजू आणि अक्रोड हे तीन नट्स विशेषतः आरोग्यासाठी अमूल्य ठरतात. यामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, फायबर, प्लांट फिनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्स हृदय, मेंदू, त्वचा, केस आणि नखांसाठी फायदेशीर आहेत. परंतु या पोषक खजिन्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचे सेवन योग्य प्रमाणात करणं महत्त्वाचं आहे.
बदाम हा सुक्या मेव्याचा राजा मानला जातो. यामध्ये भरपूर व्हिटॅमिन ई असतं जे पेशींचं ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतं. तसेच कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर आणि हृदयाच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होतं. मात्र बदामामध्ये फॅट आणि कॅलरीजचं प्रमाण जास्त असल्यामुळे दररोज ३० ग्रॅम (साधारण ५–६ बदाम) पेक्षा जास्त खाऊ नयेत. मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि त्वचा तरुण राहते.
ग्रेव्हीपासून डेझर्टपर्यंत काजूचा वापर चव वाढवण्यासाठी केला जातो, पण त्याचे आरोग्यदायी फायदे अधिक महत्त्वाचे आहेत. काजूमध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, मॅगनीज आणि अनेक जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. हे पोषक घटक हृदयाच्या आजारांपासून बचाव करतात, रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात आणि शरीराची ऊर्जा वाढवतात. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून फक्त ५ काजू खाल्ले तरी पुरेसा फायदा मिळतो.
अक्रोडला ‘ब्रेन फूड’ असंही म्हटलं जातं. यात असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, अँटिऑक्सिडंट्स आणि महत्त्वाची खनिजं हृदयाचं रक्षण करतात, टाइप २ मधुमेहावर नियंत्रण ठेवतात आणि कर्करोगाचा धोका कमी करतात. तरुण व्यक्तींनी दररोज ७ अक्रोड खाल्ले तर शरीराला उत्तम पोषण मिळतं. मात्र अति सेवन केल्यास पचनासंबंधी त्रास होऊ शकतो.
मर्यादित प्रमाणात बदाम, काजू आणि अक्रोड यांचा आहारात समावेश केल्यास दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होते. मूठभर नट्स हा छोटा बदल आयुष्यभरासाठी मोठा आरोग्याचा फायदा देऊ शकतो.