आधुनिक काळात कामाचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. डेस्क जॉब, लॅपटॉप, मोबाईल आणि वर्क फ्रॉम होममुळे तासंतास खुर्चीत एकाच जागी बसून राहणे ही अनेकांची रोजचीच सवय झाली आहे. काही काळासाठी ही गोष्ट सोपी आणि सोयीची वाटत असली, तरी दीर्घकाळ शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
बैठ्या जीवनशैलीचे गंभीर दुष्परिणाम
सतत बसून काम केल्यामुळे लठ्ठपणा, पाठदुखी, मानदुखी, हृदयविकार आणि मधुमेह यांचा धोका वाढतो. त्याचबरोबर मानसिक आरोग्यावरही ताण आणि नैराश्याचा परिणाम होतो. रक्ताभिसरण नीट न झाल्याने स्नायू आखडतात, हालचाली मंदावतात आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील वाढते.
यावर उपाय म्हणून दर २०-३० मिनिटांनी उठून थोडं चालावं, स्ट्रेचिंग करावं. शक्य असेल तर उभे राहून काही वेळ काम करण्याची सवय लावावी. ऑफिसमध्ये दिवसभर उठणं शक्य नसेल, तर घरी रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. दिवसभरात थोड्या-थोड्या हालचालींमुळे शरीराला लवचिकता मिळते, रक्ताभिसरण सुधारते आणि मन देखील प्रसन्न राहते.
त्यामुळे तुम्ही कामात कितीही व्यस्त असला, तरी दिवसातून काही मिनिटे स्वतःसाठी काढा. कारण नियमित हालचाल केल्यानेच तुमचं हृदय, शरीर आणि मन खर्या अर्थाने तंदुरुस्त राहील.