

हृदयविकाराचा धोका हळूहळू वाढत जातो त्यात सुरुवातीला त्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. शरीरात हळूहळू घाण (प्लाक) साचणे, सूज वाढणे आणि मेटाबॉलिझममध्ये बदल होणे यामुळे हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे वेळेतच याची माहिती घेऊन जीवनशैलीत बदल करणे खूप महत्त्वाचे आहे.
ॲनेस्थेसियोलॉजिस्ट आणि पेन स्पेशालिस्ट डॉ. कुनाल सूद यांच्या मते, हृदयाचा धोका फक्त एका मेडिकल टेस्टवर अवलंबून नसतो. तर तो आपल्या शरीरातील बदल आणि दैनंदिन सवयींवरही ठरतो.
नॉर्मल कोलेस्टेरॉल असूनही धोका का?
डॉ. सूद यांच्या मते, कोलेस्टेरॉलची पातळी ही फक्त त्या क्षणाची माहिती देते. मात्र वर्षानुवर्षे धमन्यांमध्ये साचलेला प्लाक यामुळे मोठा धोका निर्माण होतो. हा प्लाक अचानक फुटल्यास रक्ताचा थक्का तयार होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे फक्त 'नॉर्मल' रिपोर्टवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते.
जास्त वेळ बसून राहणे घातक
दीर्घकाळ बसून राहण्याची सवय हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. अभ्यासानुसार, सतत बसून राहिल्याने शरीरातील फॅट मेटाबॉलिझम बिघडतो, इन्सुलिन संवेदनशीलता कमी होते आणि रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
जेवणानंतर चालणे फायदेशीर
जेवणानंतर केवळ १० मिनिटे चालणेही शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि इन्सुलिनची गरज कमी होते. तसेच रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
ओमेगा-३ आणि मॅग्नेशियमचे महत्त्व
ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स शरीरातील ट्रायग्लिसराइड्स कमी करून सूज कमी करतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात. तर मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत क्रियेला स्थिर ठेवण्यास मदत करते.
जीवनशैलीत बदल का आवश्यक?
तज्ज्ञांच्या मते, केवळ औषधे किंवा सप्लिमेंट्सवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैली या गोष्टी हृदय निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)