

होळी आणि रंगपंचमी म्हटलं की रंगांची उधळण आलंच! पण मजा करताना केसांमध्ये गेलेला पक्का रंग काढताना मात्र नाकी नऊ येतात. विशेषतः केमिकलयुक्त रंगांमुळे केस कोरडे आणि राठ होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे होळीनिमित्त रंग खेळण्यापूर्वी आणि नंतर केसांची योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. काही सोप्या आणि घरगुती उपायांनी केसांमधील रंग सहज काढता येऊ शकतो.
होळी खेळण्यापूर्वी केसांना भरपूर तेल लावणं हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. नारळ तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑईल हलक्या हाताने मुळांपासून टोकापर्यंत लावल्यास केसांवर एक संरक्षक थर तयार होतो. यामुळे रंग केसांच्या आतपर्यंत शिरत नाही. शक्य असल्यास केस बांधून ठेवावेत किंवा स्कार्फ/टोपीचा वापर करावा.
रंग काढताना गरम पाण्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. प्रथम फक्त पाण्याने रंग हलका होईपर्यंत धुवा, त्यानंतर सौम्य (माइल्ड) शॅम्पू वापरा. एका वेळेस जास्त शॅम्पू घेऊन केस न धुवता दोनदा शॅम्पू घेऊन हलक्या हाताने केस धुतल्यास रंग सहज निघतो. घरगुती उपाय म्हणून दही आणि लिंबूरसाचा हेअर मास्क किंवा अॅलोव्हेरा जेल लावल्यास केसांना पोषण मिळतं आणि उरलेला रंगही निघण्यास मदत होते.
होळीची मजा रंगांमध्ये आहे, पण केसांचं आरोग्य जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. या छोट्या-छोट्या ट्रिक्स फॉलो केल्यास केसांमधील रंग चुटकीसरशी निघेल आणि केस मऊ, चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत होईल.