होळी आणि रंगपंचमीचा उत्साह आता ओसरला असला, तरी अनेकांच्या कार, बाईक किंवा स्कूटरवर अजूनही रंगांचे हट्टी डाग दिसत आहेत. सणाच्या दिवशी मजेत खेळलेले रंग नंतर वाहनावर सुकून बसतात आणि ते काढताना मोठी कसरत करावी लागते. अनेकजण घाईघाईत ब्रशने जोरात घासतात किंवा स्ट्रॉंग केमिकल वापरतात, ज्यामुळे वाहनाच्या पेंटला नुकसान होण्याची शक्यता वाढते. तर काहीजण अशा वेळी गाडी सर्व्हिसिंगला देतात किंवा वॉशिंग सेंटरमध्ये धुवून घेतात. मात्र काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही स्वतः घरच्या घरीही गाडी स्वच्छ करू शकता आणि रंगाचे हट्टी डाग सहज काढू शकता.
पक्क्या रंगामुळे वाहनाला होणारे नुकसान
होळीमध्ये वापरले जाणारे अनेक रंग केमिकलयुक्त असतात. हे रंग वाहनावर सुकल्यानंतर पक्के डाग तयार करतात. अनेकदा लोक घाबरून ब्रश किंवा कपड्याने जोरात घासतात. त्यामुळे पेंटची वरची लेयर खराब होण्याची शक्यता असते. काही वेळा स्ट्रॉंग क्लिनर वापरल्याने वाहनाचा मूळ रंगही फिका पडू शकतो. त्यामुळे रंग काढताना सौम्य पद्धत वापरणे अधिक सुरक्षित ठरते.
साबण किंवा सर्फ नाही, शॅम्पू वापरा
अनेकदा वाहन धुताना सर्फ किंवा डिटर्जंट वापरले जाते. त्यामुळे वाहन स्वच्छ दिसते; पण पाणी सुकल्यानंतर पांढरे डाग राहतात आणि चमक कमी होते. याउलट शॅम्पू वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते. शॅम्पू सौम्य असल्याने वाहनाच्या पेंटवर कमी परिणाम होतो आणि वाहनाला चांगली चमक मिळू शकते.
शॅम्पू, ENO आणि टूथपेस्टचा सोपा उपाय
वाहनावर हट्टी रंगाचे डाग असतील तर एक सोपा घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतो.
कसे कराल?
एका प्लास्टिकच्या मगमध्ये अर्ध्यापेक्षा कमी पाणी घ्या.
त्यात एक पाउच शॅम्पू घाला आणि जुन्या टूथब्रशने नीट मिसळा.
त्यानंतर थोडी टूथपेस्ट घाला.
शेवटी अर्धा पाकीट ENO टाका.
हे मिश्रण तयार झाल्यानंतर ज्या ठिकाणी रंगाचे डाग आहेत त्या ठिकाणी ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने लावा. थोडा वेळ सावकाश घासा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. जास्त जोराने घासणे टाळावे.
ENO कसे काम करते?
ENO मध्ये सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट आणि सिट्रिक ॲसिडसारखे घटक असतात. हे घटक फेस तयार करून साचलेली घाण सैल करण्यास मदत करतात. त्यामुळे रंगाची पकड हळूहळू कमी होते आणि शॅम्पू उरलेले डाग साफ करण्यात मदत करतो.
धुतल्यानंतर चमक कशी आणावी?
डाग निघाल्यानंतर वाहनाची जुनी चमक परत आणण्यासाठी शाइन स्प्रे किंवा पॉलिशचा वापर करता येतो. वाहन धुण्यापूर्वी कोरड्या कापडाने धूळ साफ करा. त्यानंतर शॅम्पू मिसळलेल्या पाण्याने नीट धुवा. वाहन पूर्ण सुकल्यानंतर शाइन स्प्रे लावून कोरड्या कापडाने हलक्या हाताने पसरवा. बाजारात साधारण १०० रुपयांपासून असे स्प्रे उपलब्ध असतात.
होळी संपली असली तरी वाहनावरचे रंगाचे डाग अजूनही त्रास देत असतील, तर या सोप्या टिप्स वापरून कार-बाईक पुन्हा स्वच्छ आणि चमकदार करता येऊ शकते.