मुलांना वारंवार चॉकलेट, बिस्किटे किंवा पॅकेज्ड स्नॅक्स खाण्याची सवय असेल, तर त्याऐवजी घरच्या घरी तयार केलेला हेल्दी एनर्जी बार हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मुरमुरे, पीनट बटर, ड्रायफ्रूट्स आणि डार्क चॉकलेटपासून बनणारा हा पदार्थ चविष्ट तर आहेच, शिवाय टिफिन किंवा मधल्या वेळच्या भुकेसाठीही योग्य पर्याय ठरू शकतो.
अगदी कमी साहित्य आणि काही मिनिटांत तयार होणारा हा एनर्जी बार मुलांसोबत मोठ्यांनाही आवडेल. चला तर मग, झटपट तयार होणारी ही सोपी रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य
२ कप मुरमुरे
३ टेबलस्पून पीनट बटर
¼ कप मनुके
८ ते १० बदाम (बारीक चिरलेले)
८ ते १० काजू (बारीक चिरलेले)
२ टेबलस्पून भोपळ्याच्या बिया
चिमूटभर मीठ
७० ते ८० ग्रॅम डार्क चॉकलेट
कृती
सर्वप्रथम मनुके २० मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून टाका.
मिक्सरमध्ये भिजवलेले मनुके, पीनट बटर आणि चिमूटभर मीठ घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
ही पेस्ट एका भांड्यात काढून त्यात मुरमुरे, चिरलेले काजू, बदाम आणि भोपळ्याच्या बिया घालून व्यवस्थित मिसळा.
तयार मिश्रण सिलिकॉन मोल्ड किंवा तुपाचा हलका हात लावलेल्या ट्रेमध्ये दाबून भरा.
आता डबल बॉयलर पद्धतीने डार्क चॉकलेट वितळवून घ्या.
सेट झालेल्या एनर्जी बारवर वितळलेले चॉकलेट ओता किंवा प्रत्येक बार चॉकलेटमध्ये बुडवून घ्या.
पुन्हा २० ते २५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून सेट होऊ द्या.
तयार झालेले एनर्जी बार कापून किंवा मोल्डमधून काढून सर्व्ह करा.
हा एनर्जी बार का ठरू शकतो चांगला पर्याय?
मधल्या वेळच्या भुकेसाठी उपयुक्त
टिफिनमध्ये ठेवण्यासाठी सोपा
ड्रायफ्रूट्स आणि बियांचा समावेश असल्याने पौष्टिक
घरच्या घरी कमी वेळात तयार होतो