डोळ्यांचे सौंदर्य अधिक उठावदार आणि आकर्षक करण्यासाठी महिला आयशॅडो, मस्कारा, आयलायनर आणि काजळ वापरतात. यामुळे डोळे अधिक रेखीव आणि उठावदार दिसतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना काजळ लावणे आवडते.
बाजारात अनेक ब्रँड्सचे काजळ उपलब्ध आहेत, पण त्यात वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातो. केमिकलयुक्त काजळ वापरल्यास डोळ्यांना इजा होण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ, डोळे लाल होणे, डोळ्यांमधून सतत पाणी येणे ही समस्या उद्भवू शकते. जर काजळ लावल्यानंतर डोळ्यांमधून वारंवार पाणी येत असेल, तर काजळ लावणे टाळावे, नाहीतर डोळ्यांचे नुकसान होऊ शकते.
आपण रोजच देवासमोर दिवा लावतो. बहुतेक लोक दिवा विझल्यावर त्यातील वाती फेकून देतात, पण त्या वाती होममेड काजळ बनवण्यासाठी वापरता येऊ शकतात. पारंपरिक पद्धतीने बनवलेले काजळ डोळ्यांना कोणतीही हानी पोहचवत नाही. रासायनिक आणि आर्टिफिशियल रंगांचा वापर न करता, केवळ या वातींचा वापर करून घरगुती पद्धतीने बनवलेले काजळ खूप फायदेशीर आहे.
घरगुती काजळ वापरण्याचे फायदे
पारंपरिक पद्धतीने बनवलेले घरगुती काजळ डोळ्यांना कोणतीही हानी पोहचवत नाही. यामध्ये कोणतेही रासायनिक पदार्थ किंवा कृत्रिम रंग वापरले जात नाहीत, त्यामुळे डोळे निरोगी राहतात.
काजळ बनवताना तुपाचा वापर केल्यास डोळ्यांमधील कोरडेपणा कमी होतो आणि डोळे नेहमी हायड्रेट राहतात.
पारंपरिक पद्धतीने बनवलेले काजळ जास्त वेळ टिकून राहते आणि डोळ्यांच्या सौंदर्यात नैसर्गिक चमक आणते.
होममेड काजळ बनवण्याची सोपी पद्धत पुढीलप्रमाणे;
साहित्य:
जळलेल्या वाती
तूप किंवा खोबऱ्याचे तेल
दिवा
ताट
कृती:
जळलेल्या वाती एका वाटीत एकत्र करा. त्यात तूप किंवा खोबऱ्याचे तेल टाका. त्यानंतर त्या वाती पुन्हा एकदा पेटवून त्यावर झाकण ठेवा. काहीवेळ झाकण दिव्यावरच ठेवून द्या. हळूहळू झाकणावर काळा थर साचू लागेल, ज्यामुळे काजळ तयार होण्यास सुरुवात होईल. वाती पूर्णपणे जळल्यानंतर, झाकणावर साचलेला काळा थर वाटीत काढा. त्यात खोबऱ्याचे तेल किंवा तूप टाकून व्यवस्थित मिक्स करा. अशाप्रकारे तयार झालेले काजळ घट्ट झाकणाच्या डबीमध्ये भरून ठेवा.
असे पारंपरिक पद्धतीने बनवलेले होममेड काजळ डोळ्यांसाठी सुरक्षित असून नैसर्गिक सौंदर्य देते.
(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)