
बिर्याणी म्हंटलं की, चिकन किंवा मटणाचे पर्याय डोळ्यांसमोर येतात. मग, शाकाहारी खवय्यांचा होतो हिरमोड. अशा वेळी बेस्ट पर्याय म्हणजे पनीर बिर्याणी. ही शाकाहारी लोकांसाठी खास आणि स्वादिष्ट डिश आहे. मऊसर पनीर आणि शाही मसाल्यांचा सुगंध घरभर हवा असेल तर 'ही' खास रेसिपी तुमच्यासाठी.
बासमती तांदूळ - २ कप
पनीर - २५० ग्रॅम (चौकोनी तुकडे)
दही - १/२ कप
कांदे - २ (बारीक चिरलेले)
टोमॅटो - २ (बारीक चिरलेले)
आले-लसूण पेस्ट - १ चमचा
हिरवी मिरची - २
लाल तिखट - १ चमचा
हळद - १/४ चमचा
गरम मसाला - १ चमचा
बिर्याणी मसाला - १ चमचा
कोथिंबीर - १/२ कप
पुदिना पाने - १/२ कप
तूप - २ चमचा
तेल - २ चमचा
दूध - १/४ कप (त्यात ४-५ केशर धागे भिजवलेले)
मीठ - चवीनुसार
संपूर्ण मसाले - तमालपत्र, दालचिनी तुकडा, लवंगा, वेलदोडे
सर्वप्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन ३० मिनिटे भिजवून ठेवा. नंतर पाणी, मीठ आणि संपूर्ण मसाले घालून शिजवून घ्या. एका बाऊलमध्ये दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला, थोडं मीठ आणि कोथिंबीर-पुदिना घालून पनीर मॅरिनेट करून २० मिनिटे ठेवा. कढईत तेल व तूप गरम करून बारीक चिरलेले कांदे सोनेरी होईपर्यंत परतून बाजूला काढा. त्याच कढईत उरलेला कांदा, टोमॅटो, मसाले आणि हिरव्या मिरच्या घालून छान परता. नंतर मॅरिनेट केलेले पनीर घालून ५-७ मिनिटे शिजवा. जाड लेयरच्या पातेल्यात आधी भाताचा थर लावा, त्यावर पनीर ग्रेव्हीचा थर, पुन्हा भात. प्रत्येक थरावर कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा आणि केशर दूध घाला. झाकण लावून कमी आचेवर १५ मिनिटे ठेवा. तयार झालेली गरम गरम पनीर बिर्याणी रायता किंवा कोशिंबिरीसोबत सर्व्ह करा. तिचा सुगंध आणि चव प्रत्येकाच्या तोंडाला पाणी आणणारी आहे.