

सकाळच्या नाश्त्याला काहीतरी गरमागरम, टेस्टी आणि पोटभरीचं खावंसं वाटतं… आणि अशावेळी ‘मेदूवडा’ हा पर्याय अनेकांच्या मनात येतो. पण घरी केलेले वडे कधी तेलकट होतात, कधी आकार बिघडतो, तर कधी आतून कच्चे राहतात म्हणूनच अनेक जण हॉटेलमधलेच वडे पसंत करतात. खरं तर काही छोट्या टिप्स आणि एक खास ट्रिक लक्षात ठेवली, तर अगदी उडपी हॉटेलसारखे मेदूवडे घरी बनवणं अजिबात अवघड नाही.
डाळ भिजवण्यापासून ते वडे तळण्यापर्यंत प्रत्येक स्टेपमध्ये थोडं लक्ष दिलं, तर वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, हलके तयार होतात. त्यासाठी बॅटर योग्य घट्ट असणं, ते हाताने फेटणं आणि तेलाचं तापमान सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं.
१. डाळ भिजवण्याची वेळ
उडीद डाळ ४-५ तासच भिजवा. जास्त वेळ भिजवल्यास वडे तेलकट होतात.
२. बॅटर घट्ट ठेवा
डाळ वाटताना शक्यतो कमी पाणी वापरा. घट्ट बॅटरमुळे वड्यांना योग्य आकार येतो.
३. बॅटर फेटणं महत्त्वाचं
हाताने एकाच दिशेने ५ मिनिटं फेटा. यामुळे बॅटरमध्ये हवा जाऊन वडे हलके होतात.
४. ‘सीक्रेट ट्रिक’ – कुरकुरीतपणा
बॅटरमध्ये १-२ चमचे रवा किंवा तांदळाचं पीठ मिसळा. यामुळे वड्यांना परफेक्ट क्रिस्पी टेक्स्चर मिळतं.
५. मीठ शेवटी घाला
तळण्याआधीच मीठ घातल्याने बॅटर पातळ होत नाही.
६. तेलाचं तापमान सांभाळा
तेल गरम करून मग मध्यम आचेवर वडे तळा, यामुळे ते आतूनही नीट शिजतात.
७. कमी प्रमाणात तळा
एकावेळी जास्त वडे टाकू नका, नाहीतर तेल थंड होऊन वडे तेलकट होतात.
८. आकार देताना पाण्याचा वापर
हाताला पाणी लावून वडा बनवा, त्यामुळे आकार नीट येतो.
साहित्य :
१ कप उडीद डाळ
१-२ चमचे रवा/तांदळाचं पीठ
मीठ (चवीनुसार)
१ टीस्पून आले-हिरवी मिरची पेस्ट
कढीपत्ता, कोथिंबीर (ऐच्छिक)
तेल (तळण्यासाठी)
कृती :
उडीद डाळ ४ ते ५ तास भिजवून तिचं पाणी पूर्ण काढून टाका. त्यानंतर कमीत कमी पाणी घालून डाळ मिक्सरमध्ये वाटून घट्ट बॅटर तयार करा. हे बॅटर एका भांड्यात काढून हाताने एकाच दिशेने ५ मिनिटं चांगलं फेटा, जेणेकरून त्यात हवा जाऊन ते हलकं होईल. आता त्यात १-२ चमचे रवा किंवा तांदळाचं पीठ, आले-हिरवी मिरची पेस्ट, कढीपत्ता आणि कोथिंबीर मिसळा. वडे तळण्याच्या अगदी आधी चवीनुसार मीठ घाला. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर ठेवा. हाताला थोडं पाणी लावून बॅटरचा गोळा घेऊन वड्याचा आकार द्या आणि मधोमध छिद्र पाडा. हे वडे गरम तेलात सोडून दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. गरमागरम मेदूवडे तयार!