हिवाळा आता हळूहळू निरोप घेत आहे. थंडी कमी होताच घरात वापरले जाणारे रग्स, ब्लँकेट्स, स्वेटर्स आणि उबदार बिछाने कपाटात ठेवण्याची वेळ येते. मात्र घाईघाईत न धुता किंवा नीट वाळवण न देता पॅक केल्यास काही महिन्यांनी बाहेर काढताना दुर्गंधी, ओलसरपणा किंवा किडींचा त्रास होऊ शकतो. थोडीशी काळजी घेतली, तर हे जाडजूड ब्लँकेट्स पुढच्या हिवाळ्यापर्यंत नव्यासारखे राहू शकतात.
आधी स्वच्छ धुवून, उन्हात वाळवा...
ब्लँकेट्स साठवण्याआधी त्यांना नीट उन्ह दाखवणं फार महत्त्वाचं आहे. किमान ३ ते ४ तास चांगल्या उन्हात ठेवून त्यातील ओल पूर्णपणे काढून टाका. जे ब्लँकेट्स धुता येतात, ती आधी धुवून घ्या आणि पूर्ण वाळल्याशिवाय पॅक करू नका. उन्हामुळे धूळ, जंतू आणि बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते.
योग्य पॅकिंग कसं कराल?
ब्लँकेट्स नेहमी कोरडी करूनच पॅक करा. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये थेट बंद केल्यास आत ओल साचू शकते. त्यामुळे सुती किंवा कापडी बॅग, किंवा आजकाल उपलब्ध असलेल्या व्हॅक्युम स्टोरेज बॅग्सचा वापर करणे अधिक सुरक्षित ठरते. पॅक करताना त्यात कडुनिंबाची पाने, डांबर गोळ्या, कापूर किंवा लवंगाच्या काही पाकळ्या ठेवल्यास किडींचा त्रास होत नाही आणि हलका सुगंध टिकून राहतो.
साठवण ठेवण्याची योग्य जागा
ब्लँकेट्स ठेवण्यासाठी जागा कोरडी, हवेशीर आणि थेट जमिनीपासून उंच असावी. लाकडी कपाट किंवा पेटीत ठेवताना आत आधी कोरडं कापड किंवा वर्तमानपत्र अंथरावं. जमिनीवर थेट ठेवणं टाळा, कारण खालून ओल लागू शकते. दर २-३ महिन्यांनी कपाट उघडून थोडी हवा लागेल अशी व्यवस्था केली तर ब्लँकेट्स जास्त काळ ताजीतवानी राहतात.
थोडी काळजी, मोठा फायदा
या छोट्या-छोट्या टिप्स पाळल्यास पुढच्या हिवाळ्यात ब्लँकेट्स बाहेर काढताना ना दुर्गंधी येईल, ना ओलसरपणा जाणवेल. थोडीशी निगा आणि योग्य साठवण तुमचे महागडे रग्स आणि ब्लँकेट्स वर्षानुवर्षे सुरक्षित आणि नव्यासारखे ठेवू शकते.