

हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. हीच ती पवित्र तिथी, ज्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागृत होतात आणि चातुर्मासाचा समारोप होतो. याच दिवशी तुळशी विवाह, साखरपुडे, मुंज आणि विवाह यांसारख्या शुभ कार्यांना सुरुवात होते. मात्र यावर्षी (२०२५) एकादशीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण दिनदर्शिकेत १ आणि २ नोव्हेंबर या दोन तारखांवर वेगवेगळ्या एकादशींची नोंद आहे.
नेमकी तारीख कोणती?
दिनदर्शिकेनुसार १ नोव्हेंबरला स्मार्त एकादशी तर २ नोव्हेंबरला भागवत एकादशी आहे. त्यामुळे कोणत्या दिवशी व्रत करावे, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
स्मार्त आणि भागवत एकादशीतील फरक
स्मार्त एकादशी ती मानली जाते जी तिथी सूर्योदयाच्या आधी सुरू होते; शैव व वैदिक पंथीय या तिथीला पाळतात.
तर भागवत एकादशी ती मानली जाते जी सूर्योदय पाहते म्हणजेच एकादशी तिथी जर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत चालू असेल, तर तीच ग्राह्य धरली जाते.
वारकरी व वैष्णव भक्त भागवत एकादशीचे पालन करतात.
थोडक्यात सांगायचं झालं, तर स्मार्त तिथी ज्ञानमार्गीय ऋषी-मुनींसाठी आणि भागवत तिथी भक्तिमार्गीय विष्णूभक्तांसाठी ग्राह्य धरली जाते.
शास्त्रानुसार व्रत कधी करावे?
शास्त्र म्हणते, "विष्णूभक्तांनी स्मार्त एकादशीला पूजा करावी, पण व्रताचरण भागवत एकादशीला करावे."
म्हणून यावर्षी २ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिकी किंवा प्रबोधिनी एकादशीचे व्रत करणे सर्वाधिक योग्य मानले गेले आहे.
तुळशी विवाह कधी होणार?
याच दिवशी म्हणजेच २ नोव्हेंबरपासून ५ नोव्हेंबर (त्रिपुरी पौर्णिमा) पर्यंत तुळशी विवाहाचे दिवस असतील.
या काळात देशभरातील मंदिरांमध्ये व घराघरांत तुलसी-विष्णू विवाहाचे विधी पार पाडले जातील, ज्यामुळे शुभकार्यांची मुहूर्तमेढ पुन्हा रोवली जाईल.
कार्तिकी एकादशी व्रत करण्याची पद्धत
१. दशमी तिथी (एक दिवस आधी):
संध्याकाळपासून तामसिक अन्न (कांदा, लसूण, मांसाहार) टाळावे
सूर्यास्तापूर्वी भोजन करून रात्री उपवास करावा
ब्रह्मचर्याचे पालन करावे
२. एकादशी तिथी (व्रत दिनी):
ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे
हातात पाणी व अक्षता घेऊन संकल्प करावा
विष्णू व लक्ष्मीची पूजा करून दिवसभर व्रत पाळावे
शक्य असल्यास फळाहार किंवा निर्जळ उपवास करावा
३. द्वादशी तिथी (पारण):
द्वादशीच्या दिवशी सूर्योदयानंतर पारण करून उपवास समाप्त करावा
वृद्ध, गरजू आणि ब्राह्मणांना अन्नदान करणे शुभ मानले जाते
धार्मिक महत्त्व
कार्तिकी एकादशीला केलेले व्रत मनोकामना पूर्ण करते, पापांचा नाश करते आणि जीवनात समृद्धी आणते असे मानले जाते.
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम रहावी, यासाठी ही एकादशी अत्यंत शुभ मानली जाते.